कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा

असा निर्णय घेणार्‍या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! हिंदूंची मंदिरे सरकारने नाही, तर भक्तांकडूनच संचालित होणे आवश्यक आहे. जर कर्नाटकमधील भाजपचे सरकार असा निर्णय घेऊ शकते, तर देशातील अन्य राज्यांनीही असा निर्णय घेतला पाहिजे ! – संपादक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे, अशी माहिती बोम्माई यांनी दिली.

मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले की, आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी माहिती दिली की, राज्यातील अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळे वेगवेगळ्या कायद्यांमुळे सुरक्षित आणि स्वतंत्रपणे संचालित होत आहेत. सध्याच्या कायद्यामुळे मंदिरांना त्यांच्या विकासासाठी मंदिराच्या उत्पन्नातील धन खर्च करण्यासाठी सरकारची अनुमती घ्यावी लागते. अशा प्रकारचे नियंत्रण रहित करून मंदिर स्वतंत्रपणे संचालित करण्यात येतील.