संपादकीय
आत्मविकासाविना बौद्धिक विकास आणि त्यातून राष्ट्रोत्कर्ष होणे केवळ असंभव !
आधुनिक युगात जागतिक समुदायाला भारतीय बुद्धीचा नेहमीच हेवा वाटलेला आहे. प्रतिभावान भारतियांच्या बळावरच अमेरिकेची भरभराट झाली आहे, असे वेळोवेळी म्हटले जाते. भारतातील आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधून शिकलेले सहस्रावधी अभियंते आज जगभरात विविध क्षेत्रांमध्ये त्यांची छाप पाडत आहेत. या भारतीय बुद्धीला स्वदेशाच्या हितामध्ये कामी आणण्यासाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यल्प प्रयत्न केले गेले. आता मात्र देशाच्या कानाकोपर्यात ‘आत्मनिर्भर भारता’चा डंका पिटला जात आहे. एकीकडे शत्रूराष्ट्र असलेल्या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा जनरेटा वाढत आहे, तर दुसरीकडे ‘दोन रेषांमधील मोठ्या रेषेला (चीनला) हात न लावता लहान रेषेलाच (भारताला) अधिक मोठी करण्या’चा प्रयत्न म्हणून ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारखी महत्त्वाकांक्षी राष्ट्रनिष्ठ सरकारी योजना राबवली जात आहे. या माध्यमातून भारतियांना विविध क्षेत्रांमध्ये उद्योगधंदे चालू करण्यासाठी आर्थिक, शैक्षणिक आदी स्तरांवर प्रोत्साहनात्मक साहाय्य केले जात आहे. यांतून उद्याचा भारत हा स्वत:च्या पायांवर उभा राहील नि बलशाली आणि स्वावलंबी बनू शकेल, अशी आशा आहे.
‘आयआयटी कानपूर’चे महत्त्व !
या सर्वांत ‘आत्मनिर्भरते’ची शिकवण समाजात रुजवण्यासाठी प्रबोधन करण्याला अत्याधिक महत्त्व आहे. अन्यथा आपल्याकडे परंपरागत किंबहुना गेल्या २-३ दशकांतील सामाजिक विचारांची दिशा पाहिली, तर मुले उच्चशिक्षण घेतल्यानंतर आणि त्यांना बहुराष्ट्रीय अथवा विदेशी आस्थापने यांमध्ये गलेलठ्ठ वेतनाची नोकरी मिळाल्यानंतर पालक समाधानी होऊन मोकळे होतात. बहुराष्ट्रीय अथवा विदेशी आस्थापने यांच्या भरभराटीसाठी हीच भारतीय मुले स्वत:च्या बुद्धीमत्तेचा कस लावून प्रयत्न करतात. त्याचा लाभ हा प्रामुख्याने संबंधित आस्थापनाच्या राष्ट्रालाच होत असतो. भारतीय समाजातील या वैचारिक प्रवाहामध्ये ‘आत्मनिर्भर भारता’चा संस्कार रुजवण्यासाठी आज शासकीय आणि खासगी स्तरांवर पुढाकार घेऊन प्रयत्न चालवले जात आहेत. त्या दृष्टीकोनातून २८ डिसेंबर या दिवशी उत्तरप्रदेशमधील औद्योगिक शहर असलेल्या कानपूरमधील जगप्रसिद्ध ‘आयआयटी कानपूर’ या विश्वविद्यालयामध्ये पंतप्रधान मोदी यांचे भाषण युवकांसाठी प्रेरणादायी ठरले. आयआयटी कानपूरच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधानांसह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. या विश्वविद्यालयाच्या समारंभाला पंतप्रधानांसारखी महनीय व्यक्ती उपस्थित रहाते, यातच खरेतर या विश्वविद्यालयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. वर्ष १९५९ मध्ये स्थापित झालेले ‘आयआयटी कानपूर’ हे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्य करणार्या भारताच्या विश्वविद्यालयांमध्ये आरंभीपासूनच प्रथम ५ सर्वाेत्कृष्ट विश्वविद्यालयांमधील एक ! १९७० च्या दशकात अमेरिकेकडून शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक साहाय्य मिळणार्या भारतीय विश्वविद्यालयांमध्ये आयआयटी कानपूर एकमेव होते. वर्ष २०१४ मध्ये जेव्हा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना सर्वाेच्च नागरी पुरस्कार असलेला ‘भारतरत्न’ मिळाला, त्याच वेळी प्राध्यापक सी.एन्.आर्. राव यांनाही हा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले होते. हे प्राध्यापकही आयआयटी कानपूरमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. अशी काही उदाहरणे या विश्वविद्यालयाचे अद्वितीयत्व प्रतिपादन करण्यासाठी पुरेशी आहेत.
‘वास्तविक’ आत्मनिर्भर बना !
२८ डिसेंबरला आयआयटी कानपूरमधील प्रतिभावान युवक-युवती विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी त्यांना अत्यंत उत्साहपूर्ण शब्दांमध्ये महत्त्वपूर्ण संदेश दिला. पंतप्रधान म्हणाले, ‘‘आजपासून २५ वर्षांनंतर (म्हणजे वर्ष २०४७ मध्ये) भारताला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील. या अडीच दशकांमध्ये भारताचा जो विकास घडेल, त्यांमध्ये मला आपले चेहरे दिसत आहेत.’’ अशा शब्दांत मोदी यांनी या नव अभियंत्यांमध्ये उत्साहाचा हुंकार भरला. मोदी यांनी ही दिशा देणे आवश्यक होते; कारण आयआयटीतून शिकून बाहेर पडलेले बहुतांश विद्यार्थी अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य राष्ट्रांत जाऊन स्थायिक होत असतात. आरंभीच कोट्यवधी रुपयांचे वार्षिक वेतन मिळवून ते ‘कुशियस करिअर’ घडवतात (आरामदायी नि प्रतिष्ठित जीवन). यांपैकी अनेक जण हे बौद्धिक सुख आणि मान-प्रतिष्ठा यांमध्ये डुंबत स्वतःचे जीवन घालवतात. अशा बुद्धीवंतांचा सर्वंकष विकास होत नाही, म्हणजेच पाश्चात्त्यांच्या विकासाच्या व्याख्येपुरतीच त्यांची मजल जाते. त्यामुळे अशा बुद्धीवंतांच्या बळावरील राष्ट्रीय विकासाचा डोलारा सर्वंकष कसा होईल ! हा विकास केवळ पोकळ असतो आणि त्याचीच फळे आज अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड यांसारखी प्रगत राष्ट्रे भोगत आहेत. सर्व सुखसोयी आहेत; परंतु त्यांना लुटण्यासाठी आनंदी मानवी मनाचा भाव कुठे आहे ? याचे कारण पाश्चात्त्य समाज दु:ख, असमाधान, महत्त्वाकांक्षा, तुलना, ईर्ष्या यांसारख्या दुष्ट स्वभावदोषांच्या खोल गर्तेमध्ये फेकला गेला आहे. त्यामुळे त्यांनी साधलेला विकास हा वरवरचा आहे. यातून हत्या, आत्महत्या, अमली पदार्थांचे सेवन, कौटुंबिक कलह, घटस्फोट आदी समस्या भेडसावत आहेत. आत्मविकासाविना बौद्धिक विकासाला अर्थ नाही, हे त्यामुळेच सांगावेसे वाटते. या अनुषंगाने दीक्षांत समारंभ तर झालाच; परंतु उद्याच्या पिढीला लहानपणापासूनच अर्थार्जनासमवेत धर्माचरण आणि साधना यांचे धडे देणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न झाल्यास खर्या अर्थाने भारत महाशक्ती आणि आत्मनिर्भर बनेल, अन्यथा चैतन्यविहीन होण्याचा धोका संभवतोच ! आजच्या अभियंत्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही भारतीय आदर्शांना स्मरून हिंदु धर्माला विसरू नका ! धर्माचरण करून साधना करा आणि तुमच्यासमवेत राष्ट्राचा उत्कर्ष साधण्याच्या महत्कार्यात सहभागी व्हा ! वास्तविक आत्मनिर्भर बना !