विद्यापीठ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन छेडणार ! – देवेंद्र फडणवीस

उच्च न्यायालय आणि राज्यपाल यांच्याकडेही दाद मागणार !

मुंबई, २९ डिसेंबर (वार्ता.) – विद्यापीठ कायद्यातील पालट हा राज्याच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असून याविरोधात जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये विद्यापीठ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात भाजप पक्ष आणि भाजयुमो संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन चालू करतील. विद्यापीठ विधेयकातील तरतुदी मागे घेईपर्यंत ते चालू राहील, अशी घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २८ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली. या विद्यापीठ विधेयकातील पालटाविषयी उच्च न्यायालय आणि राज्यपाल यांच्याकडेही दाद मागण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्याच्या इतिहासातील सर्वांत घाबरट आणि पळपुटे सरकार असल्याने या विधेयकातील पालटावर चर्चाही टाळली, तसेच विधीमंडळ सचिवालयाने त्यांना साथ दिली. देशातील सर्व विद्यापिठांना अधिक स्वायतत्ता देण्याच्या तरतुदी होत असतांना महाराष्ट्रात उलट दिशेने प्रवास चालू आहे. विद्यापीठ कायद्यात वर्ष २०१६ मध्ये एकमताने पालट केले होते आणि विद्यापिठे राजकारणापासून दूर रहातील, असा विचार केला होता; पण या विधेयकात मंत्र्यांना प्रकुलपती करून राज्यपालांचे अधिकार अल्प केले आहेत. विद्यापिठांमधील दैनंदिन कामकाज, निविदा, नियुक्त्या आणि अन्य गोष्टी यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढेल.