भारतीय विमानतळे आणि विमाने यांमध्ये भारतीय संगीत ऐकायला मिळणार !

मुंबई – भारतातील विमानतळांवर आणि विमानांमध्ये भारतीय संगीत ऐकायला मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांनी याविषयी देशातील विमान आस्थापने आणि विमानतळ संचालक यांना पत्र लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी ‘इंडियन काऊंसिल ऑफ कल्चरल रिसर्च’ या संस्थेने नागरी उड्डाण मंत्रालयाला या संदर्भात विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. (जर या संस्थेने विनंती केली नसती, तर नागरी उड्डाण मंत्रालयाने असा निर्णय घेतला नसता, हेही तितकेच सत्य आहे ! – संपादक)
उषा पाधी यांनी पत्रात लिहिले आहे की, जगभरातील बहुतांश विमानांमध्ये त्या-त्या देशांतील सर्वोत्कृष्ट गाणी ऐकवली जातात. उदाहरण द्यायचे झाल्यास, अमेरिकी विमानांमध्ये जॅझ (पाश्‍चात्त्य संगीतातील एक प्रकार), ऑस्ट्रियाच्या विमानांमध्ये मोझार्ट (१८ व्या शतकातील ऑस्ट्रियातील प्रसिद्ध संगीतकार) आणि मध्य-पूर्व देशांमधील विमानांमध्ये अरबी संगीत ऐकवले जाते; पण भारतीय विमानांमध्ये क्वचित्च भारतीय संगीत ऐकायला मिळते. आपल्याला संगीताची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशा देशातील कित्येक गोष्टींपैकी एक येथील संगीत आहे.