मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास अनुमती नाकारण्यात आल्याने भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थासमोर २८ डिसेंबर या दिवशी धरणे आंदोलन करून निदर्शने केली. या प्रकरणी आझादनगर पोलिसांनी सर्वांना कह्यात घेतले आहे. याविषयी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना अटक न करता त्यांना सोडून देण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपाळ शेट्टी यांच्या मागणीविषयी लगेच बैठक घेऊन माहिती घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन दिले.