अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले !

३ वर्षांपासून काम बंद !

डावीकडे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्‍हाण

मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईलगत असलेल्‍या अरबी समुद्रात उभारण्‍यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले आहे. न्‍यायालयाने स्‍मारकाच्‍या बांधकामाला स्‍थगिती दिली आहे. १५ जानेवारी २०१९ पासून हे काम पूर्णपणे बंद आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्‍हाण यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली. या विषयी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय स्‍मारक समितीचे अध्‍यक्ष विनायक मेटे यांनी उपस्‍थित केलेल्‍या लक्षवेधीवर अशोक चव्‍हाण यांनी वरील माहिती दिली. स्‍मारकाच्‍या बांधकामावरील स्‍थगिती उठवण्‍यासाठी सरकारकडून कोणताही प्रयत्न करण्‍यात येत नसल्‍याचा आरोप मेटे यांनी केला.

या स्‍मारकाच्‍या बांधकामाचे कंत्राट मेसर्स लार्सन अँड टुब्रो १९ ऑक्‍टोबर २०१८ या दिवशी देण्‍यात आले आहे. या स्‍मारकासाठी एकूण ३ सहस्र ६४३ कोटी ७८ लक्ष रुपये निधीला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे; मात्र स्‍मारकाच्‍या बांधकामामुळे पर्यावरणाचा र्‍हास होईल, याविषयी वर्ष २०१६ मध्‍ये जनहित याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून अंतरिम दिलासा न मिळाल्‍यामुळे याचिकाकर्त्‍याने सर्वोच्‍च न्‍यायालयात विशेष अनुमती याचिका प्रविष्‍ट केली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयाने हे प्रकरण मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडे वर्ग केले आहे. अद्याप यावरील सुनावणीची तारीख सरकार घोषित केलेली नाही.