सरपंचाने १५ लाख रुपयांहून अधिक पैशांचा भ्रष्टाचार केल्यासच माझ्याकडे तक्रार करा !

रिवा (मध्यप्रदेश) येथील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांचे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे विधान !

  • एखादा सरपंच जर १५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करत असेल, तर नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, राज्याचे मंत्री आणि केंद्रातील मंत्री किती भ्रष्टाचार करत असतील, याची कल्पना करता येत नाही ! – संपादक
  • भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी आणि त्यांना पाठीशी घालणारे अन्य लोकप्रतिनिधी हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात ! – संपादक
भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा

रीवा (मध्यप्रदेश) – माझ्याकडे सरपंचांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करू नका. जर एखादा सरपंच १५ लाख रुपयांपर्यंत भ्रष्टाचार करत असेल, तर मला त्याविषयी सांगू नका; कारण त्याने ७ लाख रुपये खर्च करून निवडणूक जिंकली आहे आणि त्याला पुढील निवडणुकीसाठी ७ लाख रुपये हवे असतात. त्यात महागाईचे १ लाख रुपये जोडले, तर १५ लाख रुपये होतात. जर एखाद्या सरपंचाने १५ लाख रुपयांहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार केला, तर मी मानू शकतो की, तो भ्रष्टाचार करत आहे किंवा त्याने घोटाळा केला आहे. सध्याची ही स्थिती आहे. हे समाजाचे नागडे चित्र आहे आणि याच क्रमाने तुम्ही वरची पायरी पाहू शकता, असे विधान येथील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी एका जाहीर सभेमध्ये केले.