सायबर गुन्हेगारीचे प्रमाण न्यून करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असतांना असे का होते ? याचेही उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे ! – संपादक
विशेष प्रतिनिधी – श्री. सुनील घनवट
मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात मागील ७ वर्षांत घडलेल्या २५ सहस्र ४६९ सायबर गुन्ह्यांपैकी केवळ ६ सहस्र ३०६ गुन्ह्यांची उकल लागली असल्याची माहिती स्वत: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्यात घडत असलेल्या एकूण सायबर गुन्ह्यांपैकी उकल लागणार्या गुन्ह्यांचे हे प्रमाण केवळ २५ टक्केच आहे. २४ डिसेंबर या दिवशीच्या विधान परिषदेत आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या तारांकित प्रश्नावर गृहमंत्र्यांनी ही लिखित माहिती दिली आहे.
गृहमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या उत्तरानुसार, सायबर गुन्ह्यांचा शोध लागावा, यासाठी राज्यात एकूण ४३ सायबर पोलीस ठाणी उभारण्यात आली आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रादेशिक स्तरावर ५ सायबर पोलीस ठाणी उभारण्यात आली आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध पदांवरील एकूण ३ सहस्र २५३ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यांतील १ सहस्र ९२२ अधिकारी आणि अंमलदार यांना सायबर गुन्ह्यांचा शोध कसा लावावा ? याविषयी दीर्घकालीन प्रशिक्षणही देण्यात आले आहे. १ सहस्र पोलिसांना ‘फॉरेन्सिक टूल्स’चेही (संगणकीय सॉफ्टवेअर) प्रशिक्षण देण्यात आले आहे. गुन्ह्यांचा तत्परतेने शोध लागण्यासाठी राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाण्यांना १६ प्रकारची यंत्रसामग्री देण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीचाही समावेश आहे.
‘एवढी यंत्रसामग्री आणि यंत्रणा असतांनाही गुन्ह्यांचा शोध लागण्याचे प्रमाण अत्यल्प का आहे ?’ यावर मात्र गृहमंत्र्यांनी भाष्य केलेले नाही.