वाळपई-फोंडा मार्गाला स्व. दीपाजी राणे यांचे नाव देण्याची देशप्रेमी नागरिकांची मागणी

वाळपई, २६ डिसेंबर (वार्ता.)  स्व. दादा राणे आणि स्व. दीपाजी राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्तरी तालुक्यामध्ये गोवा मुक्तीलढा चालू झाला. या लढ्याला मोठा इतिहास आहे. हा लढा पुढे गोवाभर पसरला. यामुळे गोव्याला पोर्तुगिजांच्या राजवटीपासून मुक्ती मिळाली. याची नोंद घेऊन शासनाने सत्तरी तालुक्यातील रस्त्यांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे द्यावीत, तसेच वाळपई-फोंडा मार्गाला स्व. दीपाजी राणे यांचे नाव द्यावे, अशी मागणी सत्तरी तालुक्यातील देशप्रेमी नागरिकांनी केली आहे. ‘सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ यांच्या वतीने ‘शहीद स्तंभ’ या परिसरामध्ये गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (‘शहीद स्तंभ’ या उर्दू नावाऐवजी ‘हुतात्मा स्तंभ’ असे नाव देणे राष्ट्रप्रेमी आणि भाषाप्रेमी ठरेल ! त्यामुळे सत्तरीतील राष्ट्रप्रेमींनी अशी मागणी प्रशासनाकडे करावी ! – संपादक) या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. या संदर्भातील प्रस्ताव शासनाला यापूर्वी सुपुर्द करण्यात आला आहे; मात्र सरकारने याची नोंद घेतलेली नाही. आगामी काळात याची विशेष नोंद घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ यांच्या सहकार्याने ‘शहीद स्तंभ’ परिसरामध्ये स्वातंत्र्यसैनिकाना पुष्पचक्र वाहून आदरांजली वहाण्यात आली. या कार्यक्रमात अधिवक्ता शिवाजी देसाई म्हणाले, ‘‘सत्तरी तालुक्याचा इतिहास हा प्रत्येकामध्ये अभिमान निर्माण करणारा आहे.  याची पोचपावती म्हणून सरकारने वाळपई-फोंडा मार्गाला स्व. दीपाजी राणे यांचे नाव द्यावे.’’ पत्रकार उदय सावंत म्हणाले, ‘‘सत्तरी तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास आज तरुण पिढीपर्यंत पोचणे आवश्यक आहे.’’ सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे संचालक प्रेमनाथ हजारे म्हणाले, ‘‘तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास न समजल्यास त्याचे दुष्परिणाम आगामी काळात समाजात दिसायला लागतील.’’