एर्नाकुलम् (केरळ) येथे प्रवासी कामगारांचे पोलिसांवर आक्रमण

  • १५ पोलीस घायाळ

  • पोलिसांच्या ३ गाड्यांची तोडफोड

पोलिसांवर आक्रमणे होत असतील आणि त्यात ते मार खात असतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ? आतंकवाद्यांपासून पोलीस स्वतःचे आणि जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक

कोच्ची (केरळ) – एर्नाकुलम् जिल्ह्यातील किझक्कंबलम् येथे ‘किटेक्स’ आस्थापनाच्या कामगारांच्या शिबिराच्या आवारात नाताळ साजरा केला जात असतांना नागालँड आणि मणीपूर येथील मद्यधुंद प्रवासी कामगारांनी पोलिसांवर आक्रमण करून हिंसाचार केला. यात पोलिसांची १ जीप जाळण्यात आली, तर २ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात एका मंडळ निरीक्षकासह १५ पोलीस घायाळ झाले. त्यांच्यापैकी काही जणांवर शस्त्रकर्मही करावे लागले; मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ‘या घटनेत सामील असलेल्या सर्वांची ओळख पटवण्यासाठी आणि पुरावा गोळा करण्यासाठी अन्वेषण चालू आहे’, असे पोलीस अधीक्षक के. कार्तिक यांनी पत्रकारांना सांगितले. किटेक्स आस्थापनात काम करणार्‍या आणि त्यांच्यासाठी बांधलेल्या गृहनिर्माण शिबिरात रहाणार्‍या सुमारे १५० कामगारांना पोलिसांनी या घटनेच्या संबंधात कह्यात घेतले. पोलिसांनी या कामगारांकडून अमली पदार्थ जप्त केले आहेत.

१. या हिंसाचाराचा प्रारंभ कामगारांच्या गटामध्ये झालेल्या वादातून झाला. त्यांनी वादानंतर येथील स्थानिक लोकांच्या घरांवर दगडफेक चालू केली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले, तर कामगारांनी त्यांच्यावरही दगड आणि लाठ्याकाठ्या यांद्वारे आक्रमण केले.

२. किटेक्सचे अध्यक्ष जैकब यांनी सांगितले की, येथील काही टोळ्या या कामगारांना अमली पदार्थ पुरवतात. त्याची नशा करून हे कामगार गोंधळ घालतात. (जर येथे स्थानिक टोळ्या अमली पदार्थ पुरवतात, हे जैकब यांना ठाऊक आहे, तर पोलिसांनाही ते ठाऊक असणार, तरीही पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, याचा अर्थ दोघांमध्ये साटेलोटे आहे, हेच स्पष्ट होते ! – संपादक)