लुधियाना (पंजाब) येथील न्यायालयात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू !

  • अनेक जण घायाळ

  • स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

लुधियाना (पंजाब) – येथील न्यायालय परिसरात स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. हा स्फोट न्यायालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील ९ क्रमांकाच्या न्यायालयात झाल्याचे सांगण्यात आले आहे. या स्फोटामुळे येथील भिंत कोसळून त्याच्या खाली काही जण दबले गेले, अशी प्राथमिक माहिती आहे. या स्फोटामुळे परिसरातील वाहनांचीही हानी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट बाँबचा असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. स्फोट झाल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात चेंगराचेगरी झाली.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार हा स्फोट न्यायालयाच्या प्रसाधनगृहामध्ये झाला. कुणीतरी येऊन हा स्फोट घडवून आणल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. याच मासामध्ये राज्यातील पाकच्या सीमेलगत असणार्‍या गुरुदासपूर जिल्ह्यातील सलेमपूर अरैयन गावातून ४ हातबॉम्ब आणि टिफिन बॉम्ब (खाऊच्या डब्यात ठेवलेला बाँब) सापडले होते. याच्या २ दिवसांपूर्वीच पोलिसांनी राज्यातील दीनानगरमधून मोठ्या प्रमाणात आर्.डी.एक्स्. स्फोटक जप्त केले होते.

बाँब जोडत असतांना स्फोट झाल्याची शक्यता

अन्वेषण यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाँब ठेवण्यासाठी तो प्रसाधनगृहात जोडत असतांना स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात बाँब जोडणारी व्यक्ती ठार झाली असल्याची शक्यता आहे.