‘गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवाराची निवड का केली ?’ याविषयीची माहिती राजकीय पक्षांनी सार्वजनिक करणे आवश्यक

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते, हेच दुर्दैव !

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची पत्रकार परिषद

पणजी, २२ डिसेंबर (वार्ता.) – आगामी विधानसभा निवडणुकीत जे राजकीय पक्ष गुन्हेगारी स्वरूपाच्या उमेदवाराची निवड करणार आहेत, त्यांनी गुन्हेगारी स्वरूप असलेल्या उमेदवाराची निवड का केली ? याविषयीची माहिती त्यांची संकेतस्थळे आणि प्रसारमाध्यमे आदींच्या माध्यमांतून सार्वजनिक करावी लागेल. त्याचप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला त्याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीविषयीची माहिती प्रसारमाध्यमे आणि दूरचित्रवाणी आदींच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज प्रविष्ट केल्यानंतर सार्वजनिक करावी लागणार आहे. उमेदवाराने प्रतिज्ञापत्र सुपुर्द केल्यानंतर किमान ३ वेळा ही माहिती द्यावी लागणार आहे, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचा एक गट २१ डिसेंबरपासून दोन दिवसीय गोवा भेटीवर होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने निष्पक्ष, सर्वांचा सहभाग असलेली, कोरोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने सुरक्षित अशी निवडणूक घेतली जाणार असल्याची ग्वाही दिली आहे.

८० वर्षांहून अधिक वयाच्या मतदारांना घरून मतदान करण्याची सेाय

८० वर्षे वयावरील मतदार, दिव्यांग आणि कोरोनाबाधित रुग्ण यांना घरबसल्या मतदान करण्याची सोय प्रथमच उपलब्ध केली जाणार आहे. राज्यात ८० वर्षांहून अधिक वय असलेले सुमारे ३० सहस्र, तर ९ सहस्र ८०४ दिव्यांग (विकलांग) मतदार आहेत. घरबसल्या मतदान करण्याची सोय हा एक पर्याय असेल; परंतु संबंधित मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याच्या सुविधेचा संबंधित ‘बी.एल्.ओ.’मार्फत अर्ज भरून लाभ घेऊ शकणार आहेत. घरबसल्या मतदान करतांना मतदानाची गोयनीयता राखली जाईल आणि त्याचे निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ध्वनीचित्रीकरण करण्यात येईल.