मांझी यांची जीभ कापणार्‍याला ११ लाख रुपये देण्याची घोषणा करणारे भाजपचे नेते गजेंद्र झा निलंबित

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केले होते हिंदु देवता आणि ब्राह्मण यांच्याविषयी अवमानकारक विधान ! – संपादक

डावीकडून भाजपने नेते गजेंद्र झा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी

नवी देहली – भाजपने नेते गजेंद्र झा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची जीभ कापणार्‍या ब्राह्मणाला ११ लाख रुपये देण्याची घोषणा गजेंद्र झा यांनी केली होती. जीतन राम मांझी यांनी हिंदूंच्या देवता आणि ब्राह्मण यांच्यावर आक्षेपार्ह विधाने केली होती. भाजपने झा यांना येत्या १५ दिवसांत स्पष्टीकरण देण्यासही सांगितले आहे. झा यांच्यावरील या कारवाईचा मांझी यांच्या ‘मांझी की हिंदुस्तानी आवाम मोर्चा’ या पक्षाने स्वागत केले आहे. गजेंद्र झा हे भाजपचे नेते असण्यासह आंतरराष्ट्रीय हिंदु महासभेचे सरचिटणीसही आहेत.

जीतन राम मांझी काय म्हणाले होते ?

जीतन राम मांझी यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. त्यात त्यांनी श्री सत्यनारायण पूजेविषयी बोलतांना म्हटले होते, ‘श्री सत्यनारायणाची पूजा वाईट आहे. आमच्या लोकांकडे (मागासवर्गीय लोकांकडे) पूजेसाठी ब्राह्मण येतात; मात्र ते म्हणतात ‘आम्ही तुमच्याकडे काहीही खाणार नाही, आम्हाला केवळ दक्षिणा द्या !’ या विधानाविषयी मांझी यांनी नंतर क्षमाही मागितली होती.