दक्षिण कोरियामध्ये ७३ टक्के लोकसंख्या तणावग्रस्त असल्याने पैसे देऊन घेत आहेत शांततेचा शोध !

शांततेच्या शोधासाठी योग्य साधना केली पाहिजे, हे कोरियातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक

सिओल (दक्षिण कोरिया) – कोरोना महामारीचा दीर्घ कालावधी आणि कामाचा दबाव यांमुळे दक्षिण कोरियातील नागरिकांना कंटाळा आला आहे. एका पहाणीनुसार तेथील ७३ टक्के लोकसंख्या स्वत:ला तणावग्रस्त मानते. औद्योगिक क्षेत्रातील लोकांमधील आत्महत्या करण्याचे प्रमाण पहाता दक्षिण कोरिया जगात वरच्या क्रमांकावर आहे. अशा वेळी लोक पैसे खर्च करून शांतता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच समस्येला त्यांनी ‘हीटिंग मंग’ नाव दिले आहे.

१. ‘हीटिंग मंग’ या संस्कृतीमध्ये लेखणी, कागद असे काहीही बाळगत नाहीत. याच्या अंतर्गत समुद्र किंवा नदी किनारी असलेल्या उपाहारगृहात बसून निसर्ग न्याहाळत रहातात. या ठिकाणी शांततेचे कठोर नियम आहेत. अनेक चित्रपटगृहांत ४० मिनिटांचा चित्रपट दाखवला जातो.

२. गंगवोन राज्यात हॅप्पीटरी फाऊंडेशनने एक कारागृह बनवले आहे. तिथे लोक लेखणी आणि कागद यांच्याखेरीज ४८ घंटे राहू शकतात. या संस्थेच्या प्रवक्त्या वू सुंग-हून म्हणाल्या की, येथे लोक स्वत:चा सामना करण्यासाठी येतात. स्वत:ला प्रश्‍न विचारून आनंद प्राप्त करतात. कोणत्याही अडथळ्याविना एकांतात रहाण्याचा अनुभव त्यांना भविष्यासाठी सिद्ध रहाण्याची शक्ती देतो.

३. एका आस्थापनात काम करणारी ३९ वर्षीय हान ये-जंग म्हणाली की, आस्थापने संघर्ष करत आहेत. पैशांमुळे पती-पत्नींमध्ये चिंता आहे. प्रत्येक जण निराशेच्या सागरात बुडाला आहे. लोकांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ‘हीटिंग मंग’ संस्कृती लोकप्रिय होत आहे. लोक कुटुुंबाखेरीज शांततेचा शोध घेत आहेत.