विशिष्ट संस्थेशी संलग्न असलेल्या काही अनुदानित शाळांनी गोवा मुक्तीदिन साजरा केला नाही ! – सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजपचे नेते

मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी

  • ही विशिष्ट संस्था कोणती, तेही कुंकळ्येकर यांनी उघडपणे सांगावे. – संपादक 
  • अशा प्रकारे शाळांमध्ये गोवा मुक्तीदिन साजरा न करणार्‍या या संस्था गोवा मुक्तीचा इतिहास तरी शिकवत असतील का ? – संपादक 
  • या शाळा पोर्तुगीजधार्जिण्या असल्यामुळे त्यांनी गोवा मुक्तीदिन साजरा केला नसेल, तर त्यांच्या शाळांची नोंदणी रहित का करू नये ? – संपादक
    गोमंतकियांनी या प्रकरणात संबंधित शाळांवर कारवाई होईपर्यंत सरकारचा पाठपुरावा करावा ! – संपादक 
पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर

पणजी, २० डिसेंबर (वार्ता.) – विशिष्ट संस्थेशी संलग्न असलेल्या काही अनुदानित शाळांनी १९ डिसेंबर या दिवशी गोवा मुक्तीदिन साजरा केला नसल्याचा दावा करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नेते तथा पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी ट्वीट करून केली आहे.

माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर ट्वीटमध्ये पुढे लिहितात, ‘‘गोवा मुक्तीदिन साजरा न करणे, ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यामध्ये हस्तक्षेप करून अशा शाळांवर कारवाई करून देशविरोधी वर्तनाला आळा घालावा.’’ आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर गोवा मुक्तीदिनावरून दुसर्‍या एका ट्वीटमध्ये लिहितात, ‘‘माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू शांतीसाठी कबुतरे उडवण्यात व्यस्त राहिल्याने त्यांना गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त करण्याचा विसर पडला. यामुळे भारत स्वतंत्र होऊन १४ वर्षांनी गोवा स्वतंत्र झाला, तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे यांना गोवा स्वतंत्र होऊनही वर्ष १९६९ पर्यंत पोर्तुगालच्या कारावासात रहावे लागले.’’