अयोध्या आणि काशी यांच्यानंतर आता मथुराही आवश्यक ! – भाजपच्या खासदार हेमामालिनी

(डावीकडे ) अभिनेत्री अन् भाजपच्या खासदार हेमामालिनी

इंदूर (मध्यप्रदेश) – अयोध्या आणि काशी यांच्यानंतर मथुराही आवश्यक आहे. त्याचेही काम व्हायला हवे, ते अजून झालेले नाही. मथुरेची खासदार असल्याने मला असे म्हणायचे आहे की, येथेही श्रीकृष्णाचे भव्य मंदिर असावे. तेथे एक मंदिर आधीच आहे आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित केलेल्या ‘काशी विश्‍वनाथ धाम’प्रमाणे नवीन स्वरूप दिले जाऊ शकते, असे विधान अभिनेत्री अन् भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. ‘काशी विश्‍वनाथ धामचा विकास करणे पुष्कळ कठीण होते. यातून मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तेच होईल’, असेही हेमामालिनी म्हणाल्या.

श्रीकृष्ण मंदिराचा वाद गेल्यावर्षी काही जणांनी मथुरा जिल्हा न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यानंतर अन् मशिदीचे ठिकाण हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याचा दावा केल्यानंतर चालू झाला. श्रीकृष्णजन्मभूमीवर असणारी ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करणार्‍या याचिकांवर स्थानिक न्यायालयात सुनावणीची प्रक्रिया चालू आहे.