पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा २ दिवसांचा पुणे दौरा चालू असून त्यांनी १९ डिसेंबर या दिवशी सकाळी प्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन प्रारंभ केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी बोलतांना अमित शहा म्हणाले, ‘‘काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध केलेली राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ आहे. ज्या काळात स्वराज्य हा शब्द उच्चारणेही कठीण होते, त्या काळात शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा संकल्प करून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी देशासाठी युवकांना प्राणांचे बलीदान देण्यासाठी प्रेरित केले. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून एक चांगले प्रशासन कसे असले पाहिजे, हे जगासमोर ठेवले. सैन्याचे आधुनिकीकरण करणे त्याचप्रमाणे सर्वात आधी नौदल बनवण्याचे काम शिवाजी महाराज यांनी केले. अशामुळे शिवाजी महाराजांचा हा पुतळा सर्वांनाच प्रेरणा देणारा असेल.’’