बीडमध्ये संतप्त माकडांच्या टोळीकडून २५० कुत्र्यांची हत्या !

बीड – बीड जिल्ह्यात एका संतप्त माकडांच्या टोळीने आतापर्यंत २५० कुत्र्यांची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे ही घटना घडली. मागील मासापासून ही संतप्त माकडांची टोळी कुत्र्यांना ठार मारत आहे. ही सर्व माकडे कुत्र्याला एखाद्या इमारतीच्या किंवा झाडाच्या वरच्या टोकावर घेऊन जातात आणि तेथून या कुत्र्याला खाली टाकून देतात. कुत्र्याच्या पिलांची हत्या करणार्‍या २ वानरांना वन विभागाच्या पथकाने १८ डिसेंबर या दिवशी जेरबंद केले आहे. गावकर्‍यांनी धारूर वन विभागात तक्रार करून या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. (अशी मागणी गावकर्‍यांना का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक)

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलाला मारले. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास प्रारंभ केला. ही माकडांची टोळी परिसरातील कुत्र्यांवर लक्ष ठेवून त्यांना पकडून नेते आणि ठार मारते. हा प्रकार मागील १ मासापासून चालू आहे. माकडांच्या भीतीमुळे या परिसरात कुत्र्यांचे वावरणे अत्यल्प झाले आहे.