अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबचा अवमान करण्याचा प्रयत्न करणार्‍याचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू

पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍याला जमाव मारहाण करून जिवंत जाळतो, तर पंजाबमध्ये धार्मिक स्थळाचा अवमान करणार्‍याला जमाव ठार करतो. दुसरीकडे हिंदू त्यांच्या धार्मिक गोष्टींच्या अवमानाविषयी वैध मार्गाने काहीतरी आणि तेही कधीतरी कृती करण्याचा प्रयत्न करतात ! – संपादक

अमृतसर (पंजाब) – येथील शिखांच्या सर्वोच्च धार्मिक स्थळ असणार्‍या सुवर्ण मंदिरातील गुरु ग्रंथ साहिब (शिखांचा पवित्र धर्मग्रंथ) यांचा अवमान करण्याचा प्रयत्न करणार्‍याला जमावाने मारहाण करत ठार केल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त करत चौकशीचा आदेश दिला आहे.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहरास साहिब पाठ (संध्याकाळची प्रार्थना) चालू असतांना एका अज्ञात व्यक्तीने कठड्यावरून उडी मारली आणि कथितपणे गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर ठेवलेल्या तलवारीला हात लावत अपवित्र काम करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तेथील जमावाने तरुणाला बाहेर नेले आणि अमानुष मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तरुण एकटाच होता, असे सांगितले जात आहे.

२. भाजपचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी यामागे कट असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून शहा यांनी योग्य अन्वेषण करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

३. १५ डिसेंबर या दिवशी या मंदिराच्या सरोवरामध्ये एका तरुणाने गुटख्याचे पाकिट फेकले होते. या वेळी मंदिराच्या सेवेकर्‍यांनी त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले होते.