थोर भारतीय ऋषिमुनी

‘भारताला ऋषिमुनींची थोर परंपरा आहे. ऋषिमुनींनी लिहिलेले वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी ग्रंथ मानवाला सर्वंकष ज्ञान देतात. त्यांमध्ये मनुष्यासाठी आचारधर्म, उपासना, साधना, संरक्षण इत्यादी सर्वच विषय आहेत. ऋषिमुनींना हे ज्ञान त्यांच्या तपोबलामुळे, म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मिळाले.

त्यांना साधनेत पूर्णत्व आल्यावर ईश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी लिहून ठेवलेल्या या अमूल्य ज्ञानामुळे मानवाला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटायला हवी. प्राचीन काळी भारतात ऋषिमुनींचे आश्रम, म्हणजे विश्वविद्यालयेच होती. भरद्वाजमुनी आणि दुर्वासऋषि यांच्या आश्रमात एका वेळी १० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी निवास करत होते. द्वापरयुगात सांदिपनी ऋषींचा आश्रम शिक्षणाचे मोठे केंद्र होता. महाभारत युद्धानंतर तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा आदी विश्वविद्यालये भारतात निर्माण झाली. ऋषिमुनींनी केवळ ज्ञान मिळवले नाही, तर अशा प्रकारे ज्ञानदानाचेही कार्य केले. त्या काळी लिखाणाचे साहित्य फारसे नसल्याने ऋषींकडून मिळालेले मौखिक ज्ञान शिष्यांकडून मुखोद्गत केले जायचे. अशा प्रकारे ते ज्ञान वृद्धींगत होत गेले आणि वर्षानुवर्षे टिकून राहिले. लाखो वर्षांपूर्वी लिहिलेले हे ग्रंथ अजूनही काही प्रमाणात टिकून आहेत, ते त्यांतील शाश्वत स्वरूपातील ज्ञानसामर्थ्य आणि चैतन्य यांमुळेच !’

– सौ. प्रियांका गाडगीळ (पूर्वाश्रमीच्या कु. प्रियांका लोटलीकर) (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.