२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी आहे. त्यानिमित्ताने…
१. ‘हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीमन्नारायणाने परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतार धारण केला आहे’, असे नाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी कोट्यवधी वर्षांपूर्वी लिहून ठेवले असणे
‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्माचा अतिरेक झाल्याने आपत्काळास आरंभ झाला आहे. आपत्काळ उत्तरोत्तर भीषण होत जाणार असून अधर्माचा नाश होणार आहे. त्यानंतर पृथ्वीवर रामराज्य स्थापन होणार आहे. ‘या भीषण आपत्काळात जे धर्माचरण आणि साधना करतील, तेच तरतील’, याची जाणीव श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले करून देत आहेत. आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठीच श्रीमन्नारायणाने परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतार धारण करून सनातन संस्थेची स्थापना केली आहे. धर्मसंस्थापनेच्या या कार्यात ‘जे जीव संपूर्ण शरणागतभावाने झोकून देऊन कार्य करतील, त्यांचा उद्धार भगवंतच करणार आहे’, असे नाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी कित्येक वर्षांपूर्वी लिहिले आहे. सनातन संस्थेचे साधक त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्याने साधकांना प्रभु श्रीरामरायाचे अखंड कृपाछत्र लाभल्याची साक्ष बुधवार, २१.४.२०२१ या दिवशी मिळाली.
२. श्रीराम पंचायतन मंदिरात आरती म्हणत असतांना मूर्तींवर लावलेले छत्र अकस्मात् फिरण्यास आरंभ होणे आणि श्रीरामाचे अस्तित्व जाणवून भावजागृती होणे
२१.४.२०२१ या दिवशी पानवळ-बांदा येथील ‘श्रीराम पंचायतन मंदिरा’त कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन करून श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने रात्री साधकांनी मंदिरात श्रीरामरायाची भजने आणि प.पू. भक्तराज महाराज यांची प्रासादिक भजने श्रीचरणी सादर केली. प.पू. दास महाराज यांनीही एक भजन म्हटले. अनुमाने रात्री ११.४५ वाजता आरती करण्यात आली. गर्भकुडीत (गाभार्यात) प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक आरती म्हणत असतांना मूर्तींवर लावलेले छत्र अकस्मात् फिरू लागले. त्या वेळी तेथे वारा किंवा पंखा चालू नव्हता, तसेच गर्भकुडीच्या खिडक्याही बंद होत्या. तेथील दिवे स्थिर होते. केवळ छत्र अर्धवर्तुळात फिरत होते. त्याकडे पाहून साधकांची भावजागृती झाली. त्या वेळी गर्भकुडीत रामरायाचे अस्तित्व जाणवत होते. प्रतिवर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी या मूर्तींवर हे छत्र लावले जाते; पण हे छत्र फिरण्याचा प्रकार प्रथमच घडला. आरती संपल्यानंतर छत्र आपोआप स्थिरावले.
३. प.पू. दास महाराज यांनी केलेले अनुभूतीचे विश्लेषण – ‘श्रीरामनवमीला मूर्तींवरील छत्र संथगतीने फिरतांना दिसणे’, याद्वारे ‘आगामी भीषण आपत्काळात साधकांवर माझे कृपाछत्र कायम राहील’, अशी प्रचीतीच श्रीरामरायाने दिली आहे !
छत्र फिरल्याचे पाहून प.पू. दास महाराज म्हणाले, ‘‘पानवळ येथे वर्ष १९७२ मध्ये ‘श्रीराम पंचायतन मंदिरा’ची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत मूर्तींवरील छत्र कधी हलतांना दिसले नाही. या वर्षीच्या श्रीरामनवमीला ते प्रथमच संथ गतीने फिरतांना दिसले. तेव्हा जाणवले, ‘सध्या कोरोना महामारीच्या माध्यमातून आपत्काळास आरंभ झाला असला, तरी सनातन संस्थेच्या साधकांवर प्रभु श्रीरामरायाने अखंड कृपाछत्र धरले आहे. ‘आगामी भीषण आपत्काळात साधकांवर माझे कृपाछत्र कायम राहील’, अशी प्रचीतीच श्रीरामरायाने आज दिली आहे. इंद्राने गोकुळावर मुसळधार पावसाचा कहर केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने एका करंगळीवर गोवर्धन पर्वताचे छत्र धरून गोपगोपींचे रक्षण केले, तसेच या आपत्काळात श्रीरामरायाने साधकांवर कृपाछत्र धरले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात ज्या साधकांनी झोकून दिले आहे, त्यांना श्रीरामरायाने कृपाछत्राखाली घेतले आहे.’’
ही अनुभूती आम्हा साधकांना दिल्यामुळे श्रीरामरूपी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. संतोष गरुड, पर्वरी, गोवा. (२८.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |