उत्तर कोरियामध्ये माजी प्रमुखाच्या पुण्यतिथीनिमित्त हसणे, आनंदी रहाणे आदी अनेक कृतींवर ११ दिवस बंदी

हुकूमशाही कशी असते, त्याची सध्याच्या पिढीला झलक दाखवणारी घटना ! हिंदूंच्या प्राचीन इतिहासामध्ये अशा प्रकारचे शासनकर्ते कधीही झाले नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

उत्तर कोरियाचे माजी नेते किम जोंग इल

प्योंगयँग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाचे माजी नेते किम जोंग इल यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त देशात शोक पाळण्यात येत आहे. त्यामुळे जनतेला हसण्यावर ११ दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. या काळात देशातील जनता आनंदी होऊ शकत नाही आणि दारूही पिऊ शकत नाही. लोकांनी कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करू नये. कुणीही बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी जाऊ नये. नियमांचे उल्लंघन केल्यास वैचारिक गुन्हेगार म्हणून संबंधितांना अटक करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला, तरी त्यांना मोठ्याने रडण्याची अनुमती नाही आणि ते शोक संपल्यानंतरच मृतदेह बाहेर काढू शकतात, असे कठोर आदेश सरकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. किम जोंग इल यांनी वर्ष १९९४ ते वर्ष २०११ पर्यंत उत्तर कोरियावर राज्य केले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सध्याचे हुकूमशाह किम जोंग उन हे किम जोंग इल यांचे धाकट पुत्र आहेत.