हीच वेळ आहे पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळण्याची !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकर्‍यांना आवाहन !

नवी देहली – रासायनिक खतांचा वापर केल्याखेरीज उत्पादनात वाढ होत नाही, हा सर्वांत मोठा गैरसमज आहे. असाच रासायनिक खतांचा वापर होत राहिला, तर मात्र शेती व्यवसायाची मोठी हानी होणार आहे. उत्पादन वाढीच्या प्रयत्नांमध्ये ना शेतभूमीचे आरोग्य जोपासले गेले आहे ना देशातील नागरिकांचे ! त्यामुळे आता नैसर्गिक शेती करण्याची हीच योग्य वेळ आहे. आतापर्यंत या पर्यांयाचा अवलंब कुणी केलेला नाही. त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी केवळ देशातच बाजारपेठ आहे, असे नाही, तर संपूर्ण जगाचे व्यासपीठ यासाठी खुले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांची मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांना केले आहे. पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेला ऑनलाईन उपस्थित राहून संबोधित करतांना हे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,

१. नैसर्गिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. हा नैसर्गिक शेतीचा पालट काही दिवसांमध्ये होणार नाही. शेतकर्‍यांना भीती आहे की, यामधून उत्पादनात घट होईल; मात्र अल्पभूधारक शेतकर्‍यांनी लागलीच सर्वच क्षेत्रावर हा प्रयोग न करता टप्प्याटप्प्याने हा पालट करणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीमुळे शेतकर्‍यांना रासायनिक खतांवर आणि किटकनाशकांवर अधिकचा खर्चही करावा लागणार नाही. हा पालट स्वीकारणे ही आता काळाची आवश्यकता झाली आहे.

२. उत्पादनवाढीसाठी खतांचा वापर आणि किटकनाशकांच्या फवारणीसाठी पुन्हा औषधांचा वापर यामध्येच शेतभूमीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे अल्प खर्चात अधिकचे उत्पादन घेण्यासाठी ‘झिरो बजेट फार्मिंग’ (शून्य पैशांमध्ये शेती) हाच पर्याय आहे.