पुणे – येथील एस्.एम्. जोशी महाविद्यालयात १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या एस्.आर्.पी.एफ्. (महाराष्ट्र पोलीस शिपाई परीक्षा) परीक्षेत अपप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेत मुख्य परीक्षार्थीच्या नावावर त्याच्या भावाने बनावट कागदपत्रे तयार करून ‘ब्लूटूथ’चा (अल्प अंतरावर विनावायर संवाद साधण्याचे तंत्रज्ञान) वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पर्यवेक्षकांना या प्रकाराची शंका आल्याने त्यांनी आरोपीची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. विशाल गबरूसिंग बहुरे असे कह्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली. आरोपीचा भाऊ भगतसिंग बहुरे हाही या वेळी परीक्षा सभागृहाच्या परिसरात होता; मात्र भाऊ पकडला गेल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला. (असे विद्यार्थी देशासाठी घातक ! राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा यांचे पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतांनाच हा प्रकार उघडकीस आल्याने मूल्यशिक्षणाची आवश्यकता या उदाहरणावरून अधोरेखित होते. शालेय शिक्षणामध्ये मूल्यशिक्षण आणि धर्मशिक्षण यांचा अंतर्भाव केल्यास शालेय जीवनातच मुलांवर संस्कार होतील. – संपादक)