सातारा येथील ‘शाहू स्टेडियम’ची विजेची जोडणी तोडल्याचे प्रकरण
सातारा, १५ डिसेंबर (वार्ता.) – १३ डिसेंबर या दिवशी वीजदेयक थकवल्यामुळे महावितरणकडून शाहू स्टेडियम येथील विजेची जोडणी तोडण्यात आली होती. हे वीजदेयक आरोग्य विभागाने थकवल्यामुळे शाहू स्टेडियमच्या क्रीडा अधिकार्यांनी आरोग्य विभागाकडे धाव घेऊन त्यांना अडचणी सांगितल्या. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक आधुनिक वैद्य (डॉ.) सुभाष चव्हाण यांनी तातडीने धनादेश देऊन शाहू स्टेडियम येथील वीजपुरवठा पूर्ववत् करण्याच्या सूचना महावितरणला दिल्या आहेत, अशी माहिती बॅडमिंटन क्रीडा प्रशिक्षक मनोज कान्हेरे यांनी दिली. आरोग्य विभाग आणि महावितरण हे दोन्ही उपक्रम शासनाचे असूनही निधीअभावी वीजदेयक थकित होते; मात्र अडचणी समजून न घेता महावितरणने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रसिद्धीमाध्यमांकडे तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
येथील ‘जम्बो कोविड सेंटर’वर ताण पडू नये, यासाठी जवळच असणार्या ‘शाहू स्टेडियम’मध्ये ८ मासांपूर्वी ‘कोरोना केअर सेंटर’ उभारण्यात आले होते. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे या कक्षातील सेवा बंद करण्यात आल्या होत्या. वीजदेयक थकित असल्यामुळे ३ मासांपूर्वी वीजवितरणकडून याविषयी संबंधित यंत्रणेला स्मरणपत्र देण्यात आले होते; मात्र तरीही वीजदेयक न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. क्रीडा विभागाकडून याविषयी सतत पाठपुरावा चालू असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे याविषयी निधी उपलब्ध असूनही तो का दिला गेला नाही ? असा प्रश्न जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी उपस्थित केला आहे. यामुळे पुन्हा एकदा शासकीय कार्यालयातील सावळा गोंधळ समाजासमोर उघड झाला.
क्रीडाप्रेमींची पालकमंत्र्यांकडे मागणी !
जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील स्वत: शाहू स्टेडियमच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष असूनही या सर्व गोष्टींकडे संबंधित शासकीय अधिकार्यांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नेमके कुठे पाणी मुरत आहे, याची चौकशी पालकमंत्र्यांनी करावी, अशी मागणी क्रीडाप्रेमी करत आहेत.
यापूर्वीही ‘जम्बो कोविड सेंटर’चे ३० लाख रुपये वीजदेयक थकवण्यात आले होते. सामाजिक प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठवल्यानंतर २८ लाख रुपये वीजदेयक भरण्यात आले होते.