महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भरतनाट्यम् विशारद कु. म्रिणालिनी देवघरे यांना भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याचा सराव करतांना आलेल्या अनुभती

‘मी नित्य भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याचा एक ते दीड घंटा सराव करत आहे. माझा भरतनाट्यम् या नृत्य प्रकाराचा नऊ वर्षांचा अभ्यासक्रम (भरतनाट्यम् विशारद) पूर्ण झाला आहे. या नृत्याचा सराव करतांना भरतनाट्यम् नृत्यातील मी विविध प्रकारांचा अभ्यास करत आहे. त्यातील ‘अडवू’ (टीप १) आणि ‘कौतुकम्’ (टीप २) हे नृत्य प्रकार मी प्रथम मानस अन् नंतर प्रत्यक्ष केले. हे प्रकार करत असतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. ‘तट्ट अडवू’ आणि ‘गणेश कौतुकम्’ हे नृत्य प्रकार मानस रितीने करतांना आलेल्या अनुभूती

१ अ. ‘तट्ट अडवू’चा (टीप ३) मानस सराव करतांना अनाहतचक्रावर उष्ण स्पंदने जाणवणे आणि तेथे चक्र फिरत असून ‘ते पिवळ्या रंगाच्या उष्ण लहरी पसरवत आहे’, असे जाणवणे : नृत्य सरावाच्या प्रारंभी मी ‘तट्ट अडवू’चा मानस सराव करतांना बसून डोळे मिटून नृत्याचे केवळ ‘तै या तै’, हे बोल म्हटले. तेव्हा ‘माझ्या अनाहतचक्रावर उष्ण स्पंदने जाणवून तेथे चक्र फिरत आहे आणि ते चक्र पिवळ्या रंगाच्या उष्ण लहरी पसरवत आहे’, असे मला जाणवले.

१ आ. ‘तट्ट अडवू’ करतांना काही वेळाने त्याची गती वाढवल्यावर मन आज्ञाचक्रावर एकाग्र होऊन आज्ञाचक्रातून एक शक्ती आत गेल्याचे जाणवणे आणि शरीर आतून हलून समोरच्या दिशेने झुकणे : थोड्या वेळाने बसूनच ‘तै या तै’ या ‘तट्ट अडवू’च्या बोलांची लय वाढवल्यावर ‘माझे मन आज्ञाचक्रावर एकाग्र होऊन आज्ञाचक्रातून मी आत आत जात आहे’, असे मला जाणवले. साधारण १० मिनिटे मला आजूबाजूचे भान नव्हते. त्या स्थितीत मला ‘माझे शरीर आतून हलत असून समोरच्या दिशेने खालच्या बाजूला झुकले आहे’, असे जाणवले.

१ इ. ‘गणेश कौतुकम्’या नृत्यप्रकाराच्या आरंभी आनंदाची स्पंदने जाणवून त्रासदायक आवरण नष्ट होणे, त्यानंतर गाणे बंद होऊन मन अंतर्मुख होऊन ध्यान लागणे : ‘गणेश कौतुकम्’ या नृत्य प्रकाराच्या आरंभी मला आनंदाची स्पंदने जाणवू लागली. थोड्या वेळाने माझ्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण जाऊन मला सहस्रारचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर मला गाणे ऐकू येण्याचे बंद होऊन मन पुष्कळ अंतर्मुख होऊन माझे ध्यान लागले.

काही वेळा मानस सराव करतांना ‘माझ्यावर नामजपादी उपाय होत आहेत’, असे मला अनुभवता आले.

कु. म्रिणालिनी देवघरे

२. प्रत्यक्ष नृत्य करतांना आलेल्या अनुभूती

२ अ. नृत्य प्रकार : ‘अडवू’

२ अ १. ‘हिमालय पर्वतावर नृत्य करत आहे’, असे जाणवणे : ‘अडवू’च्या (बोल – धित् धित् तै) पायांचा सराव करत असतांना ‘मी इथे नसून दुसरीकडे सराव करत आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझे मन पुष्कळ एकाग्र होऊन मला शांत वाटत होते. हा नृत्य प्रकार करत असतांना थोड्या वेळाने मला ‘मी हिमालयातील एका पर्वतावर नृत्य करत आहे’, असे दिसले आणि मला माझ्या अनाहतचक्रावर स्पंदने जाणवत होती.

२ अ २. थकवा असतांना अडवू नृत्य प्रकाराचा सराव करतांना पायात आपोआप ऊर्जा येऊन नृत्य करू शकणे आणि त्यातून नामजपादी उपाय होणे : ३ – ४ दिवसांनी मी याच नृत्य प्रकाराचा पुन्हा सराव केला; परंतु त्या दिवशी मला बरे वाटत नव्हते. मला पुष्कळ थकवा जाणवत होता. काही वेळाने नृत्य सरावाने माझ्या पायांत एक प्रकारची ऊर्जा येत आहे आणि ती ऊर्जा मला नृत्यासाठी शक्ती देत आहे’, असे मला जाणवले. ‘धित् धित् तै’ या अडवूच्या बोलावर आपोआप सराव होत होता. हा पायांच्या प्रकाराचा सराव असूनही थकवा न येता माझ्यावर नामजपादी उपाय झाल्यासारखे वाटले.

२ आ. नृत्य प्रकार : ‘गणेश कौतुकम्’

२ आ १. आरंभी यांत्रिकतेने सराव होणे; परंतु ‘आवरण काढून भावपूर्ण प्रार्थना केल्यावर ध्यानस्थिती अनुभवता येऊन एक प्रकारची शक्ती साधिकेच्या दिशेने येत आहे’, असे जाणवणे : सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी मला उत्साह वाटत नसल्याने मी यांत्रिकतेने सराव करत होते. त्यामुळे ‘आज नृत्याचा सराव करायला नको’, असे मला वाटत होते. थोड्या वेळाने मी माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढल्यानंतर देवाला शरण जाऊन प्रार्थना केली. मी प्रार्थना करण्यासाठी खाली झुकल्यावर मला थोडी ध्यानाची स्थिती अनुभवता आली आणि ‘एक प्रकारची शक्ती माझ्या दिशेने येत आहे’, असे मला जाणवले. मी या स्थितीतून बाहेर आल्यावर प्रथम मला ‘२ – ३ मिनिटे झाली असतील’, असे वाटले; पण अर्धा घंटा झाला होता.

२ आ २. प्रत्यक्ष नृत्य करतांना शरीर हलके वाटून ‘श्री गणेश माझ्या समवेत नृत्य करत आहे’, असे जाणवणे, त्यामुळे ऊर्जा मिळून नामजपादी उपाय होणे : त्यानंतर मी ‘गणेश कौतुकम्’ या नृत्याचा पुन्हा सराव करत असतांना आरंभी नृत्याचे गाणे म्हणतांनाच माझे ध्यान लागत होते. मला त्या गाण्यातही पुष्कळ शक्ती असल्याचे जाणवले. नृत्य करतांना माझे मन निर्विचार झाले होते. पदन्यास आणि हातांच्या हालचाली करतांना माझे शरीर फार हलके झाले होते. प्रत्येक हाताची हालचाल एकदम सहज होत होती. हे नृत्य करतांना ‘प्रत्यक्ष ‘श्री गणेश’ माझ्या समवेत नृत्य करत आहे आणि त्यामुळे ‘या नृत्यातून ऊर्जा मिळून माझ्यावर नामजपादी उपाय होत आहेत’, असे मला जाणवत होते.

२ इ. नृत्य प्रकार : ‘शिवपंचाक्षर स्तोत्र’ (शिवस्तुती)

२ इ १. प्रारंभी लक्ष नृत्यातील पदन्यासाकडे जाणे; परंतु डोळे बंद करून नृत्य करण्याचा प्रयत्न केल्यावर उत्स्फूर्तपणे नृत्य होऊन ‘शिवाच्या समवेत नृत्य करत आहे’, असे जाणवून मनाला हलकेपणा आणि शांतीची स्पंदने जाणवणे : शिवपंचाक्षर स्तोत्रावर नृत्य करतांना प्रारंभी माझे लक्ष नृत्यातील पदन्यासाकडे जात होते. नंतर मी डोळे बंद करून नृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि उत्स्फूर्तपणे जे करावेसे वाटेल, ते करून पाहिले. त्या वेळी ‘मी शिवाच्या समवेत नृत्य करत आहे’, असे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर येत होते. तेव्हा माझ्या मनाला हलकेपणा आणि शांतीची स्पंदने जाणवत होती अन् ‘नृत्य करतच रहावे’, असे वाटत होते.

‘ज्या ठिकाणी नृत्य केले, त्या ठिकाणी बसून काय जाणवते ?’, असा प्रयोग करून पाहिला. तेव्हा आरंभी माझे ध्यान लागले. त्यानंतर मला पोटापासून पायापर्यंत उष्ण स्पंदने जाणवत होती, तर पोटापासून ते डोक्यापर्यंत थंड स्पंदने जाणवत होती.’

– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.१२.२०२१)

टीप १ : ‘अडवू’ ही तमिळ आणि तेलगु भाषांमधील संज्ञा असून तिचा अर्थ ‘पदाघात’ किंवा ‘पदन्यास’ असा आहे. ‘नृत्याचा श्री गणेशा ज्या पदाघाताने केला जातो, त्याला ‘अडवू’, असे म्हणतात. भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये पद संचलन, म्हणजे ‘पाय उचलून विविध स्थितींमध्ये ठेवण्याच्या क्रियेला ‘पाद-विन्यास’ (पदन्यास) किंवा ‘पाद कर्म’, असे म्हणतात.
टीप २ : कौतुकम् : हा एक चित्ताकर्षक देवतांच्या स्तुतीपर प्रकार आहे. यात देवतेविषयीचे साहित्य सुंदर शब्दरचना आणि विविध बोल यांत गुंफलेले असते.
टीप ३ : तट्ट अडवू – हा अडवूचाच एक प्रकार. या अडवूचे बोल ‘तै या तै’, असे असतात.
• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक