सांगली, १५ डिसेंबर (वार्ता.) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती निरंतर रहाव्यात म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक (जुना स्टेशन चौक) येथे एक अनोखे शिल्प आम्ही उभे करत आहोत. हे मी स्वखर्चातून उभे करत असून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत याला होणारा विरोध मोडून काढून भाजप नगरसेविका (सौ.) स्वाती शिंदे यांनी हे नामकरण संमत करून घेतले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक’ सुशोभिकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली.
मध्यंतरी चौक सुशोभिकरणाचे काम महापूर आणि कोरोना यांमुळे थांबले होते. आता हे काम परत चालू करण्यात आले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार नितीन शिंदे, रावसाहेब खोजगे, प्रसाद रिसवडे, सागर शिंदे, प्रथमेश वैद्य, अशोक पाटील, रमेश सूर्यवंशी, सुरेश पवार, दीपक वाघमारे, सुरेश सपकाळ, अंकुश ठोंबरे, राजेश घाडगे उपस्थित होते.