जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ३१ वर्षांत केवळ १ सहस्र ७२४ जणांची हत्या ! – माहिती अधिकारात श्रीनगर पोलिसांनी दिलेली माहिती

  • यांत केवळ ८९ काश्मिरी हिंदूंचा समावेश

  • १ लाख ३५ सहस्र काश्मिरी हिंदूंचे पलायन

या माहितीवर भारतातील एकतरी हिंदू विश्‍वास ठेवू शकतो का ? अशा प्रकारची माहिती देऊन श्रीनगर पोलीस आतंकवाद्यांच्या अत्याचारांना लपवू पहात आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो ! – संपादकीय

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या ३१ वर्षांत काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी १ सहस्र ७२४ लोकांना ठार केले. त्यांपैकी केवळ ८९ जण काश्मिरी हिंदू होते, तर अन्य सर्व मुसलमान होते, अशी माहिती श्रीनगर जिल्हा पोलीस मुख्यालयाने गेल्या मासामध्ये हरियाणातील एका व्यक्तीला माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जावर दिली आहे.

दुसर्‍या अर्जावर माहिती देतांना राज्यातील १ लाख ५४ सहस्र लोकांपैकी ८८ टक्के लोक (१ लाख ३५ सहस्र लोक) ज्यांनी वर्ष १९९० पासून वाढता हिंसाचार आणि तणाव यांच्या पार्श्‍वभूमीवर खोर्‍यातून पलायन केले, ते काश्मिरी पंडित होते. उर्वरित १८ सहस्र ७३५ जण मुसलमान होते.

१. माहिती अधिकाराखाली अर्ज करणार्‍या व्यक्तीने आरोप केला आहे की, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन किंवा पुनर्वसन झालेल्या संख्येचे तपशील पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीतून वगळण्यात आले आहेत.

२. दुसरीकडे जानेवारी २०१७ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जम्मू काश्मीरमध्ये प्रतिवर्षी ३७ ते ४० नागरिकांची हत्या झाली, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी १५ डिसेंबर या दिवशी राज्यसभेत दिली.