देहलीतील ‘अकबर रोड’ला जनरल बिपीन रावत यांचे नाव द्या ! – भाजपची देहली नगरपरिषदेकडे मागणी

  • अकबर हा आक्रमणकर्ता असतांना रस्त्याला आतापर्यंत त्याचे नाव असणे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक
  • नाव पालटण्यासाठी अशा प्रकारची मागणी का करावी लागते ? नगरपरिषदेला कळत नाही का ? – संपादक
(उजवीकडे) सीडीएस् जनरल बिपीन रावत

नवी देहली – येथील ‘अकबर रोड’ला दिवंगत सीडीएस् (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख) जनरल बिपीन रावत यांचे नाव देण्याची मागणी देहलीतील भाजपकडून नवी देहली नगरपरिषदेला पत्र लिहून करण्यात आली आहे. ‘अकबर आपल्यावर आक्रमण करणारा राजा होता. त्याच्याऐवजी या रस्त्याला जनरल रावत यांचे नाव देणे अधिक योग्य आहे’, असे या पत्रात म्हटले आहे.

१. नवी देहली नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले की, आमचे या मागणीला समर्थन आहे; मात्र हा निर्णय पूर्णतः नवी देहली नगरपरिषदेचा आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नगरपरिषद विचार करेल.

२. या रस्त्याचे नाव पालटण्याची मागणी पूर्वीही झाली होती. केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी ‘अकबर रोड’चे नाव पालटून ‘महाराणा प्रताप रोड’ करावे, अशी मागणी केली होती. यापूर्वी या रस्त्याचे नाव असलेल्या फलकाची हानी करून तेथे ‘सम्राट हेमू विक्रमादित्य मार्ग’ असे फलकही लावण्यात आले होते. हिंदु सेनेने याचे दायित्व घेतले होते.