विद्यार्थ्यांना झालेला त्रास आणि हानी कधीही भरून काढता येणार नसल्याने कामचुकार आयोजक आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला हवी ! – संपादक
पारनेर (जिल्हा नगर) – ‘महाराष्ट्र राज्य पोलीस रिक्रूटमेंट’च्या वतीने ‘जेल पोलीस शिपाई पदा’साठी घेण्यात येणार्या परीक्षा केंद्राचा पत्ता आणि नावात चूक झाल्याने अनेक परीक्षार्थी त्रस्त झाले. एस्.टी. बसचा संप असल्याने अनेकांचे हाल झाले, तर दूरची परीक्षा केंद्रे मिळाल्याने विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ७ केंद्रे होती; मात्र त्यातील काही केंद्रांच्या नावात आणि पत्त्यामध्ये चूक झाल्याने राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना नवीन परिसर, एस्.टी. बसचा संप यांचा त्रास सहन करावा लागला.
सुपे येथील एम्.ई.टी. इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे अध्यक्ष अनिकेत पठारे यांनी या प्रकरणाची अधिक माहिती देतांना पुढील सूत्रे सांगितली.
१. वर्ग खोल्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आयोजकांनी कळवले.
२. परीक्षा घेण्यासाठी संबंधित विद्यालयाला प्रतिविद्यार्थी ३० रुपये, तर काही केंद्रचालकांना ४५ रुपये देणार असल्याचे सांगितले होते; मात्र कोणताच मोबदला दिला नाही.
३. प्रश्नपत्रिका पाठवल्या; मात्र त्यासमवेत कोणतेही अधिकारी नव्हते. अधिकारी १ घंटा विलंबाने आले.
४. चुकीने पारनेर येथे गेलेल्या मुलांना सुपे येथे आणण्यासाठी शाळेच्या बस पाठवून मुलांना विनामूल्य आणण्याची शाळेने व्यवस्था केली.