‘माझी आई श्रीमती दुर्गा चौबे हिच्यात परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांच्यावर असलेल्या अतूट श्रद्धेमुळेच तिने तीव्र आध्यात्मिक त्रास आणि प्रपंचातील चढ-उतार यांवर मात करत वर्ष १९९७ – ९८ पासून साधनेतील सातत्य टिकवून ठेवले आहे. ‘ती मला आई म्हणून लाभली’, हे माझे भाग्य आहे. तिच्यातील ‘इतरांची काळजी घेणे’ आणि ‘दायित्व घेणे’ या उपजत गुणांमुळे तिने केवळ मला साधनेसाठी साहाय्य केले, असे नव्हे; तर तिच्या संपर्कातील सर्वांनाच साहाय्य केले आहे. तिच्या सर्व गुणांचे वर्णन करणे माझ्यासाठी कठीण आहे.
१. बालपणापासून तीव्र आध्यात्मिक त्रास आणि आजारपण यांमुळे प्रतिकूल परिस्थिती अनुभवणे अन् श्री दुर्गादेवी आणि भगवान शिव यांची भक्ती करणे
माझ्या आईला तिच्या बालपणापासूनच तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. तिच्यावर शारीरिक आणि मानसिक या स्तरांवर वाईट शक्तींचे आक्रमण होत असे; मात्र साधना चालू करण्यापूर्वी तिला याविषयी ठाऊक नव्हते. ती ‘श्री दुर्गादेवी’ आणि ‘भगवान शिव’ यांची नेहमी भक्ती करत असे. आईचा जन्म नवरात्रीत सप्तमीला झाल्याने तिच्या पालकांनी तिचे नाव ‘दुर्गा’ ठेवले. ती सर्व सण आणि उत्सव श्रद्धेने अन् भावपूर्ण करत असे. तिचा देवाची पूजा करण्यात कधीही खंड पडला नाही. ती देवघर पुष्कळ फुलांनी सजवत असे. अनेक वर्षांपासून तिच्याकडे असलेल्या श्री दुर्गादेवीच्या चित्रात जिवंतपणा आला आहे.
२. साधनेविषयी कळताच सेवा करण्यास आरंभ करणे
वर्ष १९९७ मध्ये सनातनच्या साधिका धनबाद (झारखंड) येथे प्रसारसेवेसाठी आल्या होत्या. माझ्या आई-वडिलांच्या धार्मिक वृत्तीमुळे त्यांनी साधिकांना घरी बोलावले आणि त्यांना प.पू. गुरुदेव अन् साधना यांविषयी समजले. साधनेविषयी कळताच आई लगेच ‘घरात सत्संगाचे आयोजन करणे, सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावणे आणि हिंदी मासिक ‘सनातन प्रभात’चे (हे आता पाक्षिक स्वरूपात प्रकाशित केले जाते.) वर्गणीदार बनवणे’ इत्यादी सेवा करू लागली. माझे वडील डॉ. हरिकिशोर चौबे धनबाद येथे प्रतिष्ठित आधुनिक वैद्य होते; पण ‘लोक काय म्हणतील ?’, याचा विचार न करता आई आणि वडील, दोघांनीही रेल्वेस्थानक, पेठा (बाजार), मंदिरे आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी जाऊन प्रसार केला. आई-वडिलांमुळे आम्ही भावंडे साधना करू लागलो.
३. साधनेची तळमळ
आई माझ्याशी भ्रमणभाषवर केवळ साधनेच्या प्रयत्नांविषयीच बोलते. ‘ती साधनेत कुठे न्यून पडते ?’, याचा ती मला आढावा देते. ‘माझ्याकडून इतरांप्रमाणे अधिक सेवा होत नाही. मी प.पू. गुरुदेवांना कसे प्रसन्न करून घेऊ ?’, असे ती मला विचारते. ‘साधना करणे’, हा तिचा ध्यास असून विविध प्रकारच्या सेवा शिकण्याची तिची इच्छा आहे.
४. प्रतिकूल परिस्थितीत स्थिर रहाणे
माझ्या वडिलांचे (डॉ. हरिकिशोर चौबे यांचे) हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्याही कठीण परिस्थितीत आईने धीर सोडला नाही. तिची प.पू. गुरुदेवांप्रतीची श्रद्धा अढळ होती. त्या वेळी मी आणि माझे दोन भाऊ स्थिरस्थावर झालो नव्हतो. घरात मी एकटीच कमावणारी होते आणि माझे भाऊ शिकत होते, तरीही आईने स्वतःचे मानसिक संतुलन ढळू दिले नाही. आमच्याकडे असलेल्या अल्प पैशांत तिने सर्व दायित्व पार पाडले. प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे तिला पुष्कळ अनुभूती आल्या आणि तिची साधना वृद्धींगत झाली.
५. समष्टी सेवेची तळमळ
अ. आईची प्रकृती समष्टी सेवा करण्याची आहे. तिला भेटणार्या सर्वांना साधनेविषयी सांगून ती त्यांचा पाठपुरावा घेत असे. तिने ज्यांना साधनेविषयी सांगितले आहे, त्या सर्वांना ती सूत्रे अजूनही लक्षात आहेत. तिने पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे पुष्कळ वर्गणीदार बनवले आहेत. आमच्या कुटुंबातील कोणत्याही समारंभाच्या वेळी ती सात्त्विक उत्पादनांचे वितरण करते.
आ. एकदा आम्ही माझ्या चुलत बहिणीच्या विवाहाला गेलो होतो. त्या वेळी आई सर्वांना साधना करण्याविषयी सांगत होती. तिने तेथे सत्संग आयोजित करून सात्त्विक उत्पादनांचे वाटप केले, तसेच उच्चशिक्षित नातेवाइकांसाठी ‘आय पॅड’च्या माध्यमातून माझे यजमान श्री. शॉन क्लार्क (‘स्पिरिच्युअल रिसर्च फाऊंडेशन डॉट ओआर्जी’ या संकेतस्थळाचे संपादक, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांना साधनेविषयीच्या माहितीचे सादरीकरण करण्यास सांगितले.
इ. तिच्याकडे प्रवासासाठी पैसे अल्प असतांना ती सेवेसाठी कित्येक कि.मी. पायी चालत असे.
६. गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर कठीण परिस्थितीतही साधना चालू ठेवणे
धनबाद येथील काही साधक, माझे वडील, भावंडे आणि नातेवाईक यांना साधनेविषयी विकल्प आल्यामुळे त्यांनी साधना करणे सोडले; मात्र माझ्या आईने प.पू. गुरुदेवांवर असलेली अतूट श्रद्धा अन् भाव यांमुळे साधना करणे चालू ठेवले. माझे नातेवाईक आणि कधी कधी वडीलही आईला साधनेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करायचे; परंतु आईने त्यांना खंबीरपणे तोंड दिले. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘प.पू. गुरुदेवांनी आपल्याला साधनेच्या संदर्भात जे दिले, ते अन्य कुणीही देऊ शकत नाही. साधकांकडून चुका होऊ शकतात. त्यासाठी गुरूंना का सोडायचे ?’’
७. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही मुलीला नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्यास अनुमती देणे
माझ्या वडिलांच्या निधनानंतर आईला केवळ ४ सहस्र रुपये निवृत्तीवेतन मिळत असे. त्या मिळकतीत तिने ‘घर चालवणे, २ पुतणे आणि २ मुले यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा व्यय अन् प्रसारसेवेसाठी प्रवासाचा व्यय करणे’, या सर्व गोष्टी केल्या. त्या वेळी मी एकटीच नोकरी करत होते. मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यावर आईला प्रथम ‘मी कुटुंबाच्या आर्थिक साहाय्यासाठी नोकरी सोडू नये’, असे वाटत होते; मात्र पूर्णवेळ साधना करण्याचा माझा ठाम निश्चय असल्याने तिने मला अनुमती दिली. नंतर ती म्हणाली, ‘‘माझ्या सर्व मुलांनी ईश्वरप्राप्तीसाठी साधना आणि धर्मकार्य करावे अन् ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या परात्पर गुरुदेवांच्या कार्यात सहभागी व्हावे’, अशी माझी तीव्र इच्छा आहे.’’ माझ्या भावंडांनी तिची इच्छा पूर्ण केली नाही; परंतु मला ती पूर्ण करण्याचे भाग्य लाभले.
८. मुलांकडून अपेक्षा नसणे
आईने आम्हाला साधना करण्याचे स्वातंत्र्य देऊन आमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची मुभा दिली आहे. ‘आम्ही तिला काही द्यावे किंवा वेळोवेळी तिची विचारपूस करावी’, अशी तिची कधीच अपेक्षा नसते. आम्ही ‘अधिकाधिक साधना करावी’, असेच तिला वाटत असते.
९. संतांप्रतीचा भाव
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ वाराणसी येथे येणार असल्याचे आईला समजल्यावर ती एखाद्या बालकाप्रमाणे पुष्कळ उत्साही होते आणि मला भ्रमणभाष करून तिला शिकायला मिळालेली सूत्रे सांगते. योगतज्ञ दादाजी वैशंपायन वाराणसी येथे आले असतांना त्यांनी आईला सांगितलेले सर्वकाही तिला आठवते. ती हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांचे आज्ञापालन करते. पू. नीलेश सिंगबाळ यांनी आईला वाराणसी सेवाकेंद्रातील पूजेची सेवा भावपूर्ण करायला सांगितले आहे. ती तसे करण्याचा सतत प्रयत्न करते, तसेच त्यांचे शब्द आठवताच आईचा भाव जागृत होतो.
१०. आईमध्ये जाणवलेला पालट
आईशी बोलतांना ‘तिच्यात अधिक स्थिरता आली असून तिचे डोळे निर्गुणाकडे जात आहेत’, असे मला जाणवले.
‘आईची अशीच आध्यात्मिक प्रगती होऊन ती प.पू. गुरुदेवांच्या चरणी विलीन व्हावी’, अशी प.पू. गुरुदेवांच्या पावन चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. श्वेता शॉन क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०२०)