पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर खाते काही वेळासाठी ‘हॅक’ !

‘हॅक’ करणार्‍यांकडून ‘बिटकॉइन’ या आभासी चलनाविषयी ट्वीट

जर पंतप्रधानांचे खाते ‘हॅक’ होऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या खात्यांचे काय ? – संपादक

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते ११ डिसेंबरच्या उत्तररात्री काही वेळासाठी ‘हॅक’ करण्यात आले होते. काही वेळाने ते पुन्हा सुरळीत झाले. खाते ‘हॅक’ करून तेथे ‘बिटकॉइन’ (आभासी चलन) कायदेशीर करण्याविषयीचे एक ट्वीट करण्यात आले होते. त्यात लिहिले होते, ‘भारताने बिटकॉइनला कायदेशीर म्हणून स्वीकारले आहे. सरकारने अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी केले असून ते देशातील सर्व नागरिकांना वितरित करत आहेत.’ या ट्वीट समवेत एक लिंकही प्रसारित करण्यात आली होती. याविषयी पंतप्रधान कार्यालयाने ‘पंतप्रधानांच्या ट्विटर खात्याशी छेडछाड करण्यात आलेल्या काळात, जे ट्वीट करण्यात आले आहे, त्याकडे दुर्लक्ष करा’, असे सांगितले आहे.

याविषयी ‘ट्विटर इंडिया’ने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचे खाते ‘हॅक’ झाल्याची माहिती मिळताच आम्ही लगेच सक्रीय झालो. आमच्या तपासात ‘आतापर्यंत इतर कोणत्याही खात्यांवर परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत’, असे असे दिसून आले आहे. आम्ही पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधण्यासाठी २४ घंटे उपलब्ध आहोत. आम्हाला या ‘हॅकिंग’चा प्रकार लक्षात येताच आमच्या पथकाने त्यांचे खाते सुरक्षित करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलली.