मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. या पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करून कुटुंबियांच्या रक्षणाची मागणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्या पत्रात ‘माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका’, असे म्हटले आहे. हे पत्र पनवेलमधून कुरियरद्वारे पाठवण्यात आले आहे. पत्रावर आणि पत्राच्या लिखाणाखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. त्यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
महापौरांना आलेल्या धमकीच्या विरोधात पोलिसांत तक्रार
गृहमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी !
मुंबई – मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या विरोधात त्यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे स्वत: आणि कुटुंबीय यांसाठी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.