साडेसहा वर्षे अन्वेषण करून राज्यातील केवळ निम्म्या अनधिकृत खाण ‘लिजां’चे प्राथमिक अन्वेषण पूर्ण

गोव्यातील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याचे प्रकरण

असे कूर्मगतीने चाललेले अन्वेषण कधी घोटाळ्यातील दोषींना शिक्षा करू शकेल का ? – संपादक 

(लीज म्हणजे खनिज उत्खननासाठी काही कालावधीपुरती भूमीचा केलेला करार)

गोवा येथील खनिज खाण 

पणजी, १० डिसेंबर (वार्ता.)  राज्यातील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याचे विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) गेली साडेसहा वर्षे अन्वेषण करत आहे. या प्रकरणी १२६ खाण ‘लिजां’मध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे; मात्र आतापर्यंत विशेष अन्वेषण पथकाने ६० खाण ‘लिजां’चे प्राथमिक अन्वेषण पूर्ण करून त्याचा अहवाल सिद्ध केला आहे.

या अहवालात खाण लिजांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणे, खाण लीज कुणाच्या नावावर होते आणि खाण कोण चालवत होते ? खाण चालवण्यासाठी पर्यावरण दाखला होता का ? यांविषयी माहिती आहे. या अहवालावरून विशेष अन्वेषण पथक अंतिम निर्णय घेणार आहे, तसेच पोलीस कारवाईही होणार आहे.

अन्वेषणाविषयी अधिक माहिती देतांना गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘पर्यावरण दाखला, उत्खनन केलेल्या खनिजाची हाताळणी आणि नव्याने केलेले खनिज उत्खनन यांविषयी खाण खात्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करून ६० खाण लिजांचे अन्वेषण करून प्राथमिक अहवाल सिद्ध केला आहे. या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने १६ प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद केले आहेत आणि यामधील ८ प्रकरणी आरोपपत्रही प्रविष्ट केले आहे, तर ३ प्रकरणांचे अन्वेषण बंद करण्यात आले आहे आणि उर्वरित ३ प्रकरणांचे अन्वेषण संबंधित पोलीस ठाण्यांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. वर्ष २००७ ते २०१२ या कालावधीत देण्यात आलेल्या खाण लिजांवरून विशेष अन्वेषण पथकाने खाण खात्याला एकूण १९ प्रश्‍न विचारले आहेत आणि पथक त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे.’’