कराड, १० डिसेंबर (वार्ता.) – शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील नगरपालिकेच्या शाळेजवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्ड्यात पडून विजय विराट चव्हाण (वय ४ वर्षे) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चव्हाण कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात येऊन चव्हाण कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि पोलिसांना अन्वेषणाच्या सूचना केल्या. पोलिसांनी तातडीने ठेकेदार सत्यजितसिंह जगताप आणि सहठेकेदार समीर पटवेगार अन् खाजा अमीन सत्तार मडकी यांना अटक केली.
शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर नगरपालिकेच्या शाळेजवळ संरक्षक भिंतीसाठी खड्डे खणण्यात आले होते. त्यामध्ये पाणी साचले होते. तिथे लहान मुले खेळत होती. तेव्हा एक मुलगा सापडत नव्हता. मुलाच्या कुटुंबियांनी शोधाशोध चालू केली. थोड्या वेळाने मुलगा खड्ड्यात पडला असल्याचे निदर्शनास आले. त्याला खड्ड्यातून बाहेर काढले असता तो मृतावस्थेत आढळून आला.