सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने अतुलनीय पराक्रम करत पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. त्याचे स्मरण म्हणून सातारा येथे १२ डिसेंबर या दिवशी ‘नौदलदिन’ साजरा करण्यात येणार आहे. सातारा येथे माजी नौसैनिक संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी नौसेनेतील माजी अधिकारी आणि नौसैनिक उपस्थित होते.
करंजे पेठ येथील महासैनिक भवन येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘नौदलदिन’ साजरा होणार आहे. या वेळी वर्ष १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या नौसैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. नौसेनेचे सेवानिवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार यांचा काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सेवा मेडल देऊन गौरव केला होता. याविषयी पवार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, तसेच नौसैनिकांच्या पराक्रमाला उजाळा मिळावा यासाठी नौदलाच्या ‘बॅण्ड’ पथकाला पाचारण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.