अल्पवयीन मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करणारी घटना ! – संपादक
सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – म्हसवे गावात अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने ७ डिसेंबर या दिवशी एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी अन्वेषण करून गुन्हा उघडकीस आणला. शेजारीलच एका अल्पवयीन मुलाने ही हत्या केली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
बोर्हाडे पुढे म्हणाले, ‘‘म्हसवे येथील एका घरात विघ्नेश चोपडे (वय ५ वर्षे) याची ७ डिसेंबर या दिवशी हत्या झाल्याची तक्रार विघ्नेशचे वडील दत्तात्रय चोपडे यांनी सातारा तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली. याविषयी अज्ञाताचा शोध घेण्यासाठी पथक सिद्ध करून परिसरामध्ये विचारपूस केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी दत्तात्रय चोपडे यांच्या घराजवळील एका अल्पवयीन मुलाला कह्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने एका घरात नेऊन विघ्नेश याची हत्या केल्याचे मान्य केले. आरोपी मुलाची वैद्यकीय तपासणी केली असून त्याला ‘बालकल्याण समिती’पुढे उपस्थित करणार आहोत. पुढे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’