१० लाख डब्यांची अविरत सेवा
सोलापूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – येथील निराधार, गरजू, निराश्रित आणि अपंग व्यक्तींना प्रतिदिन २ वेळचे जेवण देणारी ‘लोकमंगल’ची अन्नपूर्णा योजना म्हणजे अनेकांची जीवनदायिनी ठरली आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाने ‘लोकमंगल फाऊंडेशन’च्या वतीने ही योजना राबवली जाते. प्रतिदिन ५५० सकस आणि पौष्टिक डबे नियमितपणे प्रत्येकाला वेळेवर रिक्शातून त्यांच्या घरापर्यंत पोचवण्यात येतात. ही योजना ८ मार्च २०१३ पासून राबवण्यात येत असून या योजनेला प्रारंभ झाल्यापासून एकही दिवस कार्यकर्त्यांनी सुटी घेतलेली नाही.
आजपर्यंत या योजनेच्या माध्यमातून ९ लाख ९८ सहस्रांहून अधिक डबे वितरित करण्यात आले आहेत. वाढदिवस, पुण्यस्मरण अशा विविध प्रसंगांच्या निमित्ताने दानशूर व्यक्ती या योजनेला धान्याच्या स्वरूपात हातभार लावतात. सिद्ध झालेल्या डब्यांची विधीवत् पूजा करून मार्गस्थ केले जातात. या योजनेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांनाही काही डबे आवर्जून प्रतिदिन देण्यात येतात. या योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.