कोल्हापूर – पंचगंगा नदीत बंधार्याजवळ शेकडो मासे मृत्यूमुखी पडलेले आढळून आले आहेत. प्रत्येक वर्षी काही मासांच्या कालावधीत अशा प्रकारे मासे मृत्यूमुखी पडलेले आढळून येतात. बहुतांश वेळा प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याचे नमुने घेते; मात्र पुढे त्याचे काय झाले, हे समोर येत नाही. अवकाळी पाऊस, औद्योगिक सांडपाणी आणि पाण्यातील प्राणवायू अल्प होणे यांमुळे मासे मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; मात्र माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्टच आहे.
पंचगंगा नदीत कोल्हापूर शहरासह ग्रामीण भाग असलेल्या तेरवाड आणि शिरोळ या ठिकाणीही वर्षातून दोन-तीन वेळा मासे मृत होण्याची घटना घडते. यंदा वारणा नदीतही मासे मृत झाल्याची घटना नुकतीच शिगाव-भादोली बंधार्याजवळ घडली; पण प्रदूषण नियंत्रण मंडळाला मासे मृत्यूमुखी पडण्याचे नेमके कारण ठाऊक नाही. तेरवाड आणि शिरोळ बंधार्याजवळ जे नाले नदीत मिसळतात, त्यातून घरगुती सांडपाण्यासमवेत औद्योगिक सांडपाणीही मिसळते. अवकाळी पाऊस पडला की, नाल्यातील पाणी नदीत जाते. या रासायनिक पाण्यामुळे मासे मृत होण्याच्या घटना घडतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते; पण याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुजोरा मिळत नाही.