देहलीतील कॅन्टोनमेंट येथे बिपीन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार

‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका

नवी देहली – सी.डी.एस्. अर्थात् ‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर १० डिसेंबरला देहलीतील कॅन्टोनमेंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांचे मृतदेह तमिळनाडूतील ‘मद्रास रेजिमेंट सेंटर’मध्ये आणण्यात आले आहेत. येथून जनरल रावत आणि मधुलिका यांचे पार्थिव देहलीत आणण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली. रावत यांचे अंतिम दर्शन १० डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेता येणार आहे. यानंतर कामराज मार्ग ते बेरार चौकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टरचे ‘ब्लॅक बॉक्स’, ‘फ्लाइट डेटा रिकॉर्डर’ आणि ‘कॉकपिट व्हाइस रिकॉर्डर’ सापडले !

हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले, त्या घटनास्थळी फॉरेंसिक सायन्स डिपार्टमेंटचे एक पथक गेले आहे. त्याचे नेतृत्व संचालक श्रीनिवासन् करत आहेत. घटनास्थळावरून ‘फ्लाइट डेटा रिकॉर्डर’ आणि ‘कॉकपिट व्हाइस रिकॉर्डर’ मिळाले आहे. येथे हेलिकॉप्टरचा ‘ब्लॅक बॉक्स’ही सापडला आहे. या ‘बॉक्स’च्या आधारे हेलिकॉप्टर आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील शेवटच्या संभाषणातून अपघाताचे कारण समजू शकणार आहे.