देहलीच्या सीमेवरील शेतकर्‍यांचे आंदोलन मागे !

११ डिसेंबरला सर्व शेतकरी देहलीच्या सीमेवरून मागे फिरणार

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – संयुक्त किसान मोर्चाने देहलीच्या सीमेवर ३७८ दिवसांपासून चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. शेतकरी संघटनांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. ११ डिसेंबरपर्यंत शेतकरी देहलीची सीमा सोडून जातील, असे मोर्चाकडून सांगण्यात आले आहे. ९ डिसेंबरला सकाळी केंद्र सरकारचे शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगणारे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर दुपारी शेतकर्‍यांची बैठक झाली. त्यानंतर आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली. हेलिकॉप्टर अपघातात मृत झालेले सैनिक आणि जनरल बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारामुळे शेतकरी आनंद साजरा करणार नाहीत, तर शोकसभा घेणार आहेत. त्यानंतर ११ डिसेंबरला देहलीच्या सीमेवर आनंद साजरा केला जाईल आणि त्यानंतर शेतकरी आपापल्या घराकडे परत जातील, असे सांगण्यात आले आहे. ‘आम्ही आंदोलन मागे घेतले असले, तरी मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करू’, अशी चेतावणीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रहित केल्यानंतरही शेतकर्‍यांनी सरकारपुढे नव्या मागण्या मांडल्या होत्या. यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांतील आंदोलनाच्या काळात शेतकर्‍यांवर प्रविष्ट करण्यात आलेले खटले मागे घेणे, आंदोलनाच्या काळात जीव गमावलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देणे, शेतातील तण (पिक काढल्यानंतरचा राहिलेला भाग) जाळल्याच्या प्रकरणी गुन्हा न नोंदवणे आदी मागण्यांचा समावेश आहे. शेतकर्‍यांनी किमान आधारभूत किमतीवर चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. या समितीचे सदस्य संयुक्त किसान मोर्चा निवडणार आहे.