भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता ! – निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रेय शेकटकर

निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रेय शेकटकर

पुणे – भारताला संरक्षण आणि हवाई क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना अल्प कालावधीत उत्पादनांमध्ये साकार करणे त्याचसमवेत विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रेय शेकटकर यांनी व्यक्त केले. ‘इंडियन नॅशनल सोसायटी फॉर एरोस्पेस अँड रिलेटेड मेकॅनिझम’ (इनसार्म) पुणे, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डी.आर्.डी.ओ.) तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शेकटकर बोलत होते.

या वेळी डी.आर्.डी.ओ.चे अध्यक्ष, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे (डीआयएटी) कुलगुरु, ए.आर्.डी.ई.चे संचालक, इनसार्मचे सचिव आदी मान्यवर उपस्थित होते. ‘एरोस्पेस आणि संरक्षण संबंधित यंत्रणेतील नवकल्पना आणि आव्हाने’ असा परिषदेचा मुख्य विषय होता. या परिषदेमध्ये डी.आर्.डी.ओ., इस्रो, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये यांतील ३७५ हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. बदलत्या युद्धनीतीनुसार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी संशोधक, विद्यार्थी यांनी नवनवीन कल्पना आणि संशोधन यांवर भर देण्याचे आवाहन शेकटकर यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्र आणि उद्योग यांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे, असे मत डी.आय.ए.टी.चे कुलगुरु डॉ. सी.पी. रामनारायण यांनी व्यक्त केले.