६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सुचलेल्या कविता !
‘कु. सायली रवींद्र देशपांडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर ‘ती आश्रमजीवनाशी एकरूप होण्याचा जलद गतीने प्रयत्न करत आहे’, असे माझ्या लक्षात आले. तिचे स्वतःचे असे एक ‘गुरुभावविश्व’ आहे. त्यामध्येच ती सतत रममाण असते. आमचे परात्पर गुरु डॉक्टर किंवा साधना यांविषयी बोलणे चालू असतांना, तसेच आश्रमात वास्तव्याला असणार्या संतांच्या दर्शनानेही सायलीचा भाव जागृत होतो. तिची ती भावावस्था बराच काळ टिकून असते. दिवसभरात सेवा करतांना किंवा अन्य कृती करतांनाही ती तिच्या त्या ‘गुरुभावविश्वा’तच असते. ‘प्रार्थना करणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि प्रत्येक कृती प.पू. गुरुदेवांना जोडणे’, यांतच तिचे मन गुंग असते. त्यातूनच तिला परात्पर गुरुदेवांवरील काव्यपंक्ती सुचतात.
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी (८.१२.२०२१) या दिवशी कु. सायली रवींद्र देशपांडे हिचा १२ वा वाढदिवस आहे. कु. सायलीला वेळोवेळी सुचलेल्या आणि तिने टिपून ठेवलेल्या तिच्या कविता वाढदिवसानिमित्त येथे दिल्या आहेत.’
– श्रीमती मेघना वाघमारे (आजी, (आईची आई)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑक्टोबर २०२१)
कु. सायली रवींद्र देशपांडे हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
हे सुदर्शनधारी, भक्ता तू तारी ।
‘१२.९.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमात असतांना एका भाववृद्धी सत्संगात एक काकू त्यांना दिसलेल्या श्रीकृष्णाच्या विराट रूपाविषयी अनुभूती सांगत होत्या. त्या वेळी मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.
पितांबर अंगी पिवळा, चरण तुझे कोवळे ।
तन, मन आणि ध्यान माझे त्यांच्याकडे वळे ।
हे सुदर्शनधारी, भक्ता तू तारी, दानवा तू मारी, सर्व दुःख निवारी ।। १ ।।
नाभीत वसे ब्रह्मा, मुकुटी वसे ब्रह्मांड ।
मुखकमल सुकुमार, मनी उघडी भावाचे द्वार ।। २ ।।
दृष्टी तुझी भक्तांवरी, राज्य तुझे जगतावरी ।
करुणेचा तू सागर भारी, शक्ती अपार तुझी ।। ३ ।।
हे त्रिलोकनाथा, तूची भक्तीचा दाता ।
तूची पिता, तूची माता, तूची कर्ता-करविता ।। ४ ।।
हीच विनंती करते आता, दाखविण्या मार्ग मोक्षाचा ।
यावे नाथा आमुच्या दारी, यावे नाथा आमुच्या दारी ।। ५ ।।
– कु. सायली देशपांडे (१२.९.२०२१)
नेण्या साधकां मोक्षासी, आले नारायण जन्मासी ।
‘२०.९.२०२१ या दिवशी भाववृद्धी सत्संगात सत्संग घेणार्या साधिका सांगत होत्या, ‘‘सर्व साधकांसाठी परात्पर गुरुदेव धरतीवर अवतरले आहेत’, हे आपले किती भाग्य आहे !’’ त्यावरून मला सुचलेल्या या कवितेच्या ओळी मी गुरुचरणांवर कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे.
नेण्या साधकां मोक्षासी ।
तारण्या सर्व मानवांसी, आले नारायण जन्मासी ।। १ ।।
रूप मनोहर, छबी सुंदर, वेधून घेई मनासी ।
आले गुरुवर सगुणात, आले नारायण जन्मासी ।। २ ।।
आपत्काळी स्थिती भयंकर, गुरुमाऊली तूच साहाय्य करी ।
आणण्या हिंदु राष्ट्र, आले नारायण जन्मासी ।। ३ ।।
जाळे मायेचे मोठे, घाला घाली मानवाच्या श्रद्धेवरी ।
या मायेतून बाहेर काढण्यासी, आले नारायण जन्मासी ।। ४ ।।
कलियुगातील सत्ययुग आणण्यासी, धर्मसंस्थापना करण्यासी ।
नेण्या साधक मोक्षासी, आले नारायण जन्मासी ।। ५ ।।
– कु. सायली देशपांडे (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२०.९.२०२१)
कृपा करा गुरुवर ।
‘सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यानंतर माझ्या मनात परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) दर्शनाची तीव्र ओढ निर्माण झाली. त्यांची पुष्कळ आठवण येऊन माझे मन व्याकुळ झाले. त्या वेळी मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.
कृपा करा गुरुवर । मजवर कृपा करा गुरुवर ।
चरणांशी घ्या मज गुरुवर । कृपा करा गुरुवर ।। १ ।।
रूप सुंदर, छबी मनोहर । दर्शन घडवा गुरुवर ।
कृपा करा गुरुवर । मजवर कृपा करा गुरुवर ।। २ ।।
रामरूपी परमात्मा गुरुवर । कृष्णरूपी आत्मा गुरुवर ।
सच्चिदानंद परब्रह्म गुरुवर । मजवर कृपा करा गुरुवर ।। ३ ।।
मनपुष्प हे स्वीकारा गुरुवर । तव स्मरण सदा होऊ द्या मज गुरुवर ।
कृपा करा गुरुवर । मजवर कृपा करा गुरुवर ।। ४ ।।
कृतज्ञता असो मनात । असो समर्पण मनात ।
चरणांची धूळ बनवा गुरुवर । मजवर कृपा करा गुरुवर ।। ५ ।।
तुमच्या चरणांशी ठेवा गुरुवर । मोक्षाच्या द्वारी ठेवा गुरुवर ।
कृपा करा गुरुवर । मजवर कृपा करा गुरुवर ।। ६।।
– कु. सायली देशपांडे (१२.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |