मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर २०२१ या दिवशी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यांतील ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ ( obc reservation ) जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार्या नगरपंचायतींच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांमध्ये ज्या जागा ‘नागरिकांचा मागास प्रवर्गा’साठी आरक्षित आहेत, तेथे निवडणूक घेण्यास स्थगिती आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान म्हणाले की,…
१. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या १५ पंचायत समित्या यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ या दिवशी मतदान होणार आहे.
२. ४ महानगरपालिकांतील ४ रिक्त पदे आणि ४ सहस्र ५५४ ग्रामपंचायतींतील ७ सहस्र १३० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ या दिवशी मतदान होणार आहे.
३. मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.
४. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गा’साठी आरक्षित जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्ग या जागांसाठी पूर्व घोषित कार्यक्रमानुसार निवडणूक प्रक्रिया चालू रहाणार आहे.
५. ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ या जागांच्या स्थगित करण्यात आलेल्या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.