जेजुरी (जिल्हा पुणे) – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला ५ डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून ८ डिसेंबरपर्यंत ‘मल्हार महोत्सवा’चे आयोजन पालखी मैदान येथे करण्यात आल्याची माहिती मार्तंड देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. यानिमित्ताने गडकोट आवार मंदिराला विद्युत् रोषणाई, तर मुख्य मंदिर गाभारा पाने, फुले आणि फळे यांनी सजवण्यात येणार आहे. या वेळी ‘श्रीं’ची भूपाळी, आरती झाल्यानंतर मुख्य मंदिरात ‘पाकाळणी’ होऊन नित्य वारकरी, सेवेकरी, पुजारी यांच्या हस्ते उत्सवमूर्तींना पोशाख परिधान केला जाईल.
बालद्वारी (रंगमहाल) येथे विधीवत् घटस्थापना होऊन खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ होईल. या वेळी मार्तंड देवस्थानच्या वतीने ‘म्हाळसा-बाणाई अन्नसेवा कक्षा’चे लोकार्पण जेजुरीकर ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी वर्गाच्या हस्ते करण्यात येईल. या चंपाषष्ठी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी दिली.