किल्ले वंदनगडाचे नाव कधीही पालटणार नाही ! – वनपरिक्षेत्र अधिकारी, वाई, सातारा

  • ‘किल्ले वंदनगड’चे ‘पीर किल्ले वंदनगड’ करण्याचा धर्मांधांचा डाव फसला !

  • हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश !

किल्ले वंदनगड

सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ऐतिहासिक ‘किल्ले वंदनगडा’चे नाव पालटून ते ‘पीर किल्ले वंदनगड’, असे करून शासकीय स्तरावर इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले होते. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री, तसेच पुरातत्व आणि वन विभाग यांना निवेदन देऊन ‘किल्ले वंदनगड’ असेच नाव ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार वाई (जिल्हा सातारा) वनपरिक्षेत्र अधिकारी एस्.एस्. मगर यांनी ‘वन विभागाकडून कधीही ‘किल्ले वंदनगडा’चे नाव पालटण्यात आले नाही आणि यापुढेही पालटण्यात येणार नाही’, असे लेखी आश्वासन हिंदु जनजागृती समितीला २९ नोव्हेंबर या दिवशी पत्र पाठवून दिले.

‘किल्ले वंदनगड’ नाव कायम न ठेवल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याची हिंदु जनजागृती समितीची चेतावणी ! 

‘महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात बांधलेल्या गडकोट किल्ल्यांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. हे गडकोट किल्ले महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. असे असतांना त्यांचे नाव जाणीवपूर्वक पालटून समाजात तणाव निर्माण करण्याचे काम काही शासकीय विभागांतून होतांना दिसत आहे. वन विभागाने पत्रव्यवहार करतांना ‘किल्ले वंदनगडा’चा उल्लेख ‘पीर किल्ले वंदनगड’, असा केला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि समस्त हिंदु समाज यांचा अवमान आहे. ‘वन विभागाने त्यांच्या पत्रात ‘पीर किल्ले वंदनगड’ असा उल्लेख का केला ? याचा खुलासा वन विभागाने करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोटांचे नाव परस्पर पालटणार्‍या संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली. याविषयीचे निवेदनही १२ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्र्यांसह प्रशासनातील अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

वन विभागाकडून बैठकीत चूक झाल्याचे मान्य : काळजी घेण्याचे आश्वासन !

याविषयी भुईंज (जिल्हा सातारा) येथील पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समितीचे पदाधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत ‘शासकीय कार्यपद्धतीमुळे तक्रार अर्जातील उल्लेख ‘जसाच्या तसा’ घेण्यात आला आहे’, असे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी मान्य केले, तसेच ‘यापुढे काळजी घेऊ’, असे आश्वासनही त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. यासह त्यांनी या आशयाचे लेखी पत्रही २९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीला दिले.

काय आहे प्रकरण ?

वाई तालुक्यातील ‘किल्ले वंदनगड’ येथे हिंदूंच्या प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात शिवभक्तांनी पत्र्याची शेड उभारली होती. याविषयी काही धर्मांधांनी वनविभागाच्या भूमीवर अतिक्रमण झाले असल्याची तक्रार ४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी वाई वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली होती. या वेळी वनविभागाशी पत्रव्यवहार करतांना धर्मांधांनी ‘किल्ले वंदनगडा’चा उल्लेख ‘पीर किल्ले वंदनगड’, असा हेतूपुरस्सर केला. प्रशासनाकडून धर्मांधांच्या तक्रारीला देण्यात आलेल्या लेखी उत्तरातही या गडाचा उल्लेख ‘पीर किल्ले वंदनगड’ असा करण्यात आला होता. ही गोष्ट हिंदु जनजागृती समितीला समजल्यानंतर समितीच्या वतीने ‘या गडाचे ‘पीर किल्ले वंदनगड’ऐवजी ‘किल्ले वंदनगड’, असेच नाव कायम ठेवण्यात यावे’, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले.

छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र रोखा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

सातारा – वन विभागाने ‘किल्ले वंदनगडा’चा ‘पीर किल्ले वंदनगड’ असा उल्लेख करणे, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान आहे.  या संदर्भात ‘धर्मांधांचा ‘पीर किल्ले वंदनगड’ असे नाव प्रचलित करण्याचा डाव फसला आहे. यासह ‘विशाळगडावरील रेहानबाबाचा दर्गा, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या थडग्याजवळील अतिक्रमण, ठाण्यातील मलंगडावरील हिंदूंच्या पूजेत धर्मांधांकडून येणारे अडथळे आदी पहाता छत्रपती शिवरायांच्या गडांचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जात आहे का, असा प्रश्न पडतो. छत्रपती शिवरायांचे गडकोट हे आपला स्वाभिमान, पराक्रम आणि शौर्य यांचे प्रतीक आहेत. छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसणार्‍यांपासून सावध राहून धर्मांधांचे षड्यंत्र रोखले पाहिजे. किल्ले वंदनगड प्रकरणी उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली.