प्रेमभाव, उत्तम नियोजनकौशल्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी (गोवा) आश्रमातील श्री. गिरीश पाटील !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (७.१२.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संशोधनाशी निगडित सेवा करणारे श्री. गिरीश पाटील यांचा २५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त सहसाधक श्री. आशिष सावंत यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. गिरीश पाटील

श्री. गिरीश पाटील यांना २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. इतरांना साहाय्य करणे

‘श्री. गिरीश यांच्यामध्ये प्रेमभाव आहे. सहसाधकाने त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे साहाय्य मागितले, तर ते तत्परतेने आणि आनंदाने साहाय्य करण्यास सिद्ध होतात.

२. शिकण्याची वृत्ती

गिरीश यांच्यामध्ये शिकण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांना जी गोष्ट ठाऊक नसते, ते ती पटकन शिकून घेतात. त्या संदर्भात त्यांचा ‘अशा कृती करतांना इतर साधकांचा वेळ घ्यायला नको. मी स्वावलंबी असायला हवे’, असा दृष्टीकोन असतो.

३. साधनेत साहाय्य करणे

ते माझ्या चुका अतिशय नम्रपणे सांगून मला साधनेत साहाय्य करतात. त्या वेळी ते मला भावनिक आणि मानसिक स्तरावर न हाताळता आध्यात्मिक स्तरावर हाताळतात.

४. संशोधक वृत्ती

त्यांच्यामध्ये मुळातच संशोधक वृत्ती आहे. त्यांना आध्यात्मिक अथवा वैज्ञानिक संशोधनासंदर्भात एखादा प्रयोग सुचला, तर ते मला लगेच सांगतात आणि ‘आपण अशा प्रकारे प्रयोग करू शकतो का ?’, हे तत्परतेने विचारून घेतात.

श्री. आशिष सावंत

५. कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करणे

गिरीश आश्रमातील सर्व कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन करतात आणि कोणी करत नसेल, तर ते अत्यंत नम्रपणे समोरच्या साधकाला त्याची जाणीव करून देतात.

६. उत्तम नियोजनकौशल्य

गिरीश यांच्यात उत्तम नियोजनकौशल्य आहे. यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) रीडिंगसाठी लागणार्‍या वस्तूंची त्या संबंधित साधकांशी चांगला समन्वय करून आधीच पूर्वसिद्धता करून ठेवतात. त्यामुळे ती सेवा परिपूर्ण आणि नियोजनबद्ध होते. त्यातून पुष्कळ आनंद मिळतो.

७. चुकांविषयी संवेदनशीलता

गिरीश यांच्याकडून काही चूक झाल्यास ते सर्व साधकांसमोर स्वतःची चूक सांगून क्षमायाचना करतात. ती चूक लगेचच फलकावर लिहून त्या चुकीसाठी आवश्यक ते प्रायश्चित्तसुद्धा घेतात.

८. मायेची आसक्ती नसणे

अ. गिरीश समवेत शिक्षण घेणार्‍या मुलांना चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळाल्या आहेत. जेव्हा त्यांना हे कळते, तेव्हा त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. ते म्हणतात, ‘‘मला देवाने योग्य ठिकाणी आणले. नाहीतर मी व्यावहारिक जीवनात रममाण झालो असतो. माझी साधना झाली नसती.’’ याविषयी त्यांना कृतज्ञता वाटते.

आ. संशोधन सेवेमध्ये सतत पांढरे कपडे घालावे लागतात. त्याचा त्यांना आनंद वाटतो. ते म्हणतात, ‘‘बरं आहे. देव आपली आसक्ती अल्प करून आपल्याला वैराग्याकडे घेऊन जात आहे. आपल्याला त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायला नकोत.’’

९. वेळेचे गांभीर्य असणे

ते कधीच अनावश्यक बोलत नाहीत. त्यांना वेळ वाया घालवलेला आवडत नाही.

१०. पालटण्याची तळमळ असणे

गिरीश यांची स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ आहे. त्यासाठी त्यांना कुणी त्यांची चूक सांगून साहाय्य करण्याचा प्रयत्न केला, तरी ते आनंदाने स्वीकारून त्या दृष्टीने प्रयत्न चालू करतात.

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

ते पूर्वीच्या तुलनेत अधिक आनंदी दिसतात. ‘त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यामध्ये पुष्कळ चांगला पालट झाला आहे’, असे आश्रमातील बरेच साधक सांगतात. तेव्हा ‘ते सर्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे झाले आहे’, असे कृतज्ञताभावाने सर्वांना सांगतात. ते कधीच कोणत्या गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी सर्व लगेच अर्पण करतात.
परात्पर गुरु डॉक्टरांनी मला श्री. गिरीश यांच्यासारखा आध्यात्मिक सर्वगुणसंपन्न मित्र दिला; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. आशिष सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२.१२.२०२१)