मडगाव – गोवा शासनाच्या वतीने मडगाव येथील दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधीकरण मैदानात आयोजित केलेल्या ‘गोवा सरस २०२१’ या प्रदर्शनाच्या ५ डिसेंबर या दिवशी झालेल्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ग्रामीण विकास संस्थेचे मंत्री मायकल लोबो हे दोघेही अनुपस्थित राहिले आणि यामुळे अखेर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनाचे ५ डिसेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता उद्घाटन होणार होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ग्रामीण विकास संस्थेचे मंत्री मायकल लोबो उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावतील म्हणून आयोजकांनी सुमारे दीड घंटा त्यांची वाट पाहिली आणि त्यानंतर उद्घाटन समारंभ पुढे ढकलून तो दुपारी ४ वाजता करण्यात आला. उद्घाटनाचा वेळ पालटूनही दोघेही अनुपस्थित राहिले आणि यामुळे राज्यभर हा एक चर्चेचा विषय बनला आहे.