भावजागृतीचे प्रयत्न करतांना साधिकेला परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांना साधनेच्या बसमध्ये बसवून शेवटच्या स्थानाकडे (मोक्षाकडे) घेऊन जात असल्याचे दृश्य दिसणे

‘३१.१.२०१९ या दिवशी सकाळी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून मी भावजागृतीचे प्रयत्न करत होते. गुरुमाऊलीने माझ्यासाठी आतापर्यंत जे केले आहे, त्यासाठी त्यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त केली. मी त्यांना प्रार्थना केली, ‘तुमच्या चरणांशी मला एका लहानातील लहान कणाएवढी जागा द्या. त्यासाठी तुम्ही माझे साधनेचे प्रयत्न वाढवून घ्या.’ तेव्हा मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले.

आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने

१. परात्पर गुरु डॉक्टर सारथ्य करत असलेल्या बसमध्ये साधकांची गर्दी असून बस मोक्षाच्या दिशेने जात असणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांची साधनेची बस आहे. या बसमध्ये चढण्यासाठी केवळ मागील बाजूला एक दार आहे. बसमधून उतरायला पुढच्या बाजूला दार नाही. बस पुढे जात असलेली वाट, म्हणजे थेट आकाशाच्या दिशेने जाणारा पिवळसर केशरी अशा रंगाचा प्रकाशाचा झोत आहे. ‘ती वाट मोक्षाकडे जाते’, असे मला जाणवले. परात्पर गुरुदेव स्वतः बसचे सारथ्य करत आहेत. बसच्या वर तळपणारा आणि सर्वत्र चैतन्यमय पिवळा प्रकाश देत असलेला सूर्य आहे. सकाळच्या वेळी बसमध्ये ज्याप्रमाणे मागच्या दारातून आत चढणार्‍या प्रवाशांची पुष्कळ गर्दी असते, तसेच या बसमध्ये साधक आणि जिज्ञासू दाराच्या शेवटच्या पायरीपर्यंत उभे होते. बसमधील सर्व आसनांवर साधक बसले होते. बसमध्ये पुष्कळ गर्दी होती.

२. बसच्या मागील भागात जिज्ञासू बसले असून बसचा मधला भाग निळसर रंगाचा, म्हणजे साधना करू लागलेल्या साधकांच्या भक्तीचा रंग असणे आणि पुढील पिवळसर केशरी रंग, म्हणजे मोक्षाकडे वाटचाल करणारे साधक असणे

मला या बसच्या मागच्या बाजूचा रंग लालसर, मध्यभागाचा रंग फिकट निळा आणि पुढच्या बाजूचा रंग पिवळा दिसला. तो पिवळा रंग पुढे केशरी होऊन बसच्या पुढच्या बाजूने थेट आकाशाकडे जात होता.

याविषयी मला जाणवले, ‘बसच्या मागील भागात नवीन साधक आणि जिज्ञासू बसले आहेत. ते परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यानुसार साधना करून बसच्या पुढच्या भागातील आसनांवर बसत आहेत, म्हणजेच त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे. त्यांची जशी आध्यात्मिक उन्नती होत आहे, तसे ते पुढच्या टप्प्याला जात आहेत. ते सर्व जण आकाशाकडे, म्हणजे मोक्षाच्या दिशेने चालले आहेत.’

३. गुरुमाऊली या साधनेच्या बसमधे बसलेल्या प्रत्येक साधकाला मोक्षापर्यंत घेऊन जाणार असल्याविषयी आश्वस्त करत असणे

गुरुमाऊली सर्वांना सांगत आहेत, ‘तुम्ही बसमध्ये केवळ घट्ट धरून बसा. मार्गात कितीही खड्डे, अडथळे आले, तरी घाबरू नका. तुम्ही ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया भावपूर्ण, तळमळीने, चिकाटीने आणि श्रद्धेने करा. तुम्ही साधनेसाठी वेळोवेळी सांगितलेले प्रयत्न करा. तुम्हाला कितीही अडथळे आले, त्रास झाले, तरी डळमळू नका. तुम्हा सर्वांची प्रगती होणारच आहे. मी तुम्हाला शेवटच्या स्थानकापर्यंत, म्हणजे मोक्षापर्यंत नेणारच आहे.’

४. प्रार्थना

हे दृश्य पाहिल्यावर माझी भावजागृती होऊन मला आनंदाश्रू आले. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर मला पुष्कळ आनंद झाला. ‘मला सतत तुमच्या भावसागरात डुंबता येऊ दे. माझ्याकडून तुमच्या चरणांची सेवा अखंड घडू दे’, ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने, फोंडा, गोवा. (१४.२.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.