प्रेमभाव, साधनेची ओढ, सेवेची तळमळ असलेल्या आणि मुलाला पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहित करणार्‍या वर्धा येथील श्रीमती सुमती सरोदे (वय ६० वर्षे) !

१. साधना समजल्यानंतर चित्रपट पहाणे पूर्णपणे बंद करणे

‘साधनेत येण्यापूर्वी आईला चित्रपट पहाणे आणि गाणी ऐकणे इत्यादींची आवड होती. वर्ष १९९८ मध्ये साधनेत आल्यावर तिने चित्रपट बघणे पूर्णपणे बंदच केले. ती सांगायची, ‘‘निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण आपला वेळ साधनेलाच द्यायला हवा.’’

श्री. सुमित सरोदे

२. साधनेची ओढ

अ. आई ‘वेळ वाया जाणार नाही’, याची काळजी घेते. ती सतत कार्यरत असते. पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत ती न थकता काहीतरी करत असते. तिची झोपही अल्प आहे.

आ. आईकडे सत्संग घेण्याची सेवा होती. त्यासाठी कुठलाही सण असो अथवा प्रकृती ठीक नसो, ती सत्संग घ्यायला वेळेतच जायची.

३. सेवेची तळमळ

अ. पूर्वी आईला ‘सेवेसाठी अधिक वेळ देऊ शकत नाही’, याची खंत वाटायची. त्यामुळे वर्ष २००५ मध्ये तिने स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ सेवेला आरंभ केला.

आ. एकदा तिची प्रकृती ठीक नव्हती. तिला उठताही येत नव्हते. त्याही स्थितीत ती गाडी चालवत एका गावी सत्संग घ्यायला गेली.

इ. आईला प्रवासात अथवा कुठेही कुणीही व्यक्ती भेटली की, ती तत्परतेने त्यांना साधना सांगते. आईने अनेकदा रेल्वे आणि बस यांमध्ये प्रवास करतांना धर्मप्रसार केला आहे.

ई. आम्हाला अंगफलक (यावर अध्यात्मप्रसाराचे लिखाण केलेले असते.) घालून प्रसार करण्यास लाज वाटायची. तेव्हा आई आम्हाला सांगायची, ‘‘गुरूंचे कार्य करण्यास न्यूनपणा वाटू नये. सेवा ही आपल्या अहं-निर्मूलनाचे माध्यम आहे.’’

उ. आई कधी नातेवाइकांकडे गेली, तर त्यांच्या शेजारचे आणि परिचयातील सर्वांना एकत्रित करून साधनेचे महत्त्व सांगते. तिने आम्ही रहात असलेल्या वसाहतीमध्ये १ – २ गणेश मंडळांशी संपर्क करून त्यांना संस्थेचे कार्य सांगितले. तेथे प्रसार करून २ प्रवचने घेतली आणि तेथे कार्य चालू केले.

४. नातेवाइकांना वारंवार साधनेचे महत्त्व सांगून त्यांना साधनेला प्रवृत्त करणे

आमच्या घरात आई सर्वप्रथम साधनेत आली. तेव्हा नातेवाइकांचा तीव्र विरोध होता, तरीही आई सर्वांना वारंवार साधनेचे महत्त्व सांगत होती. त्यामुळे आधी विरोध असणारे नातेवाईक आता साधक झाले आहेत. आता माझी मावशी आणि दोन मामा यांचे कुटुंब साधनारत आहे. आईच्या सासरचे नातेवाईकही साधना आणि धर्मशास्त्र यासंदर्भात आईकडून जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करतात.

५. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना साधनेसाठी प्रवृत्त करणे

आईने दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार आणि किरकोळ अंक घेणारे यांना जोडून ठेवले आहे. ती वाचकांना सत्संगाला आणि सेवेला येण्यास प्रवृत्त करत असे. ती प्रत्येक वाचकाला सनातनची सात्त्विक उत्पादने आवर्जून देत असे.

६. कर्तेपणा न घेणे

विदर्भातील तीव्र उन्हातही तिने तळमळीने प्रसार केला. या संदर्भात अनेक वाचक आणि विज्ञापनदाते विचारायचे. तेव्हा ती श्रद्धेने सांगायची, ‘‘गुरूंची सेवा आहे. ते काळजी घेतात.’’ पुष्कळ वेळा वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक आईला सकारात्मक प्रतिसाद द्यायचे. तेव्हा आई त्यांना सांगायची, ‘‘सर्व साधकांच्या माध्यमातून तुमच्याकडे ईश्वरच येत असतो.’’

७. सनातनच्या आकाशकंदिलांचे वितरण करतांना समाजातील लोकांना धर्मकार्याची जाणीव करून देणे

ती दिवाळीच्या वेळी सनातनचे ‘आकाशकंदिल’ आवडीने वितरण करायची. आकाशकंदिलावरील लिखाण (यावर अध्यात्मप्रसाराचे लिखाण केलेले असते.) पाहून समाजातील काही लोक तिला म्हणायचे, ‘‘तुम्ही तुमचेच विज्ञापन करत आहात.’’ तेव्हा आई त्यांना धर्मकार्याची जाणीव करून द्यायची. ती सांगायची, ‘‘यामुळे आपल्याला धर्मप्रसाराची संधी मिळत आहे. इतर पंथीय त्यांच्या धर्मप्रसाराची संधी कधीही सोडत नाहीत.’’ त्यामुळे समाजातील पुष्कळ लोक आकाशकंदिल घ्यायचे.

८. आसक्ती नसणे

आईला पैशांविषयी आसक्ती नाही. ती नोकरी करत असूनही तिने स्वतःसाठी कधी काही घेतले नाही. ती अधिकाधिक पैसे अर्पण करत असे.

९. दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील चौकटी आणि सनातनच्या ग्रंथांत दिलेले आचारधर्म इत्यादींचे आई तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करते. त्याविषयी इतरांनाही सांगते.

१०. मुलांना साधना करण्यास प्रोत्साहन देणे

१० अ. मुलाच्या सेवेत व्यत्यय येऊ नये; म्हणून भ्रमणभाषवर मोजकेच बोलणे : मी रामनाथी येथील सनातनच्या येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. आईही पुष्कळ वेळा जळगाव आणि वाराणसी येथील आश्रमांमध्ये सेवेसाठी असते. ती क्वचितच काही काम असल्यास मला भ्रमणभाष करते आणि माझ्या सेवेत व्यत्यय येऊ नये; म्हणून भ्रमणभाषवर मोजकेच बोलते.

१० आ. व्यावहारिक शिक्षणापेक्षा पूर्णवेळ गुरुसेवा करण्यास सांगणे : तिने आमच्या मनावर ‘कधी व्यवहारात मोठे काही ध्येय गाठायचे आहे’, असे बिंबवले नाही. उलट ती नेहमी आम्हाला ‘‘साधना करा’’, असे सांगायची. ‘‘व्यावहारिक शिक्षणापेक्षा पूर्णवेळ होऊन गुरुसेवा करा’’, असे ती नेहमी सांगायची. १० वी आणि १२ वी नंतर ‘‘पुढील शिक्षणापेक्षा आईने पूर्णवेळ साधनेला प्राधान्य द्या’’, असे आम्हाला सांगितले होते.

१० इ. मुलाला पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणे : माझा पूर्णवेळ साधना करण्यासाठी पुष्कळ संघर्ष होत होता. ‘माझे एवढे शिक्षण झाले आहे. आता मी नोकरी केली नाही, तर पुढे मला चाकरी मिळणे कठीण जाईल’, अशी सतत मनात भीती वाटायची. त्या वेळी आईने सांगितले, ‘‘तुला पैशांची अडचण असेल, तर मी देईन; पण तू पूर्णवेळ साधनेची संधी सोडू नकोस. जीवन क्षणभंगूर आहे. यात नोकरी, विवाह इत्यादींमध्ये अडकून आपल्याला काय मिळणार ? शेवटी यातले काहीच आपल्या समवेत येणार नाही. ‘नंतर साधना करू’, अशी स्थिती असेलच, असे नाही; म्हणून आताच साधनेला प्राधान्य दे. तुझ्या प्रगतीमध्येच आम्हाला समाधान आहे.’’

११. संतांनी कौतुक करणे

वर्ष २००३ मध्ये वर्ध्याला शुद्धीकरण मोहीम (साधकांकडून झालेल्या चुका आणि त्यांचे दोष यांची जाणीव करून देऊन साधकांना अंतर्मुख करण्याची प्रक्रिया) झाल्यानंतर तिकडचे सेवाकेंद्र बंद करण्यात आले. तेव्हा आईने लगेच आमचे घर सेवाकेंद्रासाठी दिले; म्हणून प.पू. देशपांडेकाकांनी (परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांनी) तिचे कौतुक केले. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळवल्यावर ते म्हणाले, ‘‘अरे वा ! छान झाले. आता त्यांच्या घरातील पूर्वजांचे सर्व त्रास दूर होतील.’’

१२. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा

अ. आम्ही धर्मप्रसारानिमित्त बाहेर असल्यामुळे आई पुष्कळ वर्षे घरी एकटी असायची. तेव्हा तिला कधी भीती वाटली नाही. तेव्हा पुष्कळ वेळा शेजार्‍यांच्या घरात साप निघणे, बाजूच्या दोन्ही घरांमध्ये चोरी होणे, असे प्रकार व्हायचे; पण गुरूंच्या कृपेने आमच्या घरी अशी अडचण कधीही आली नाही. ती म्हणायची, ‘‘मी पूर्ण गुरूंवर सोपवून रहाते.’’

आ. ती असेल तेथे आनंदी असते. देवावर दृढ श्रद्धा असल्याने तिला अन्य कसली चिंता नसते. ‘मुलांना गुरूंच्या चरणी पाठवले आहे, आता तेच त्यांचे सर्व बघतील’, अशी तिची दृढ श्रद्धा आहे.

१३. आईमध्ये जाणवलेले पालट

अ. आईची मायेतील आसक्ती अल्प झाली आहे. ती नातेवाइकांना म्हणते, ‘‘आता मला घरी बोलावू नका. मी आपत्काळ संपल्यावरच तुमच्याकडे येईन.’’

आ. वाराणसीला साधकसंख्या न्यून असल्यामुळे सेवा पूर्ण होण्यास अडचण निर्माण होऊ शकते; म्हणून ती तिकडेच रहाण्याचा विचार करत आहे.

इ. आधी आई काही चुकीची गोष्ट दिसली की, प्रतिक्रियात्मक बोेलायची; परंतु आता आवश्यक असल्यासच ती शांतपणे चूक सांगण्याचा प्रयत्न करते.

ई. आईचा प्रेमभाव वाढला आहे. ती घरी असतांना आम्हाला घरी उत्साह जाणवतो.

‘हे गुरुदेवा, आम्हाला साधना करायला प्रोत्साहन देणारी आई लाभल्यामुळे मी पूर्णवेळ साधना करत आहे. साधनेमुळे मला आणि माझ्या जीवनाला योग्य मार्ग मिळाला. आपल्या चरणांपर्यंत येण्याची संधी मिळाली, यासाठी आपल्या कोमल चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सुमित भागवत सरोदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२१)